आता या अन्यायाचा कळस झाला आहे--आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:56 AM2020-03-13T11:56:09+5:302020-03-13T11:59:20+5:30
जर या मोचार्नंतर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास शेवटी आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी ही शासनाला आमची विनंती आहे. तरी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा नाही येथून पुढील काळात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
सांगली : सांगली जिल्हा आदिवासी कोळी, महादेव, टोकळे, ढोर कोळी, मल्हार, डोंगर कोळी जमात संघर्ष समितीच्यावतीने २४ मार्च रोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन समितीच्यावतीने अप्पर जिल्हाधिका-यांना देण्यात आले.
समितीच्यावतीने हे निवेदन अप्पर जिल्हा अधिकारी मौसमी बर्डे यांना देण्यात आले. यावेळी समितीचे संजय कोळी, कुमार आप्पा कोळी, हणमंत पाटील, डी. के. पाटील, प्रविण पाटील, पांडूरंग कोळी अमोल नाद्रेकर, धर्मेद्र कोळी, जयसिंगराव कोळी, विनायक येडके उपस्थित होते. संजक कोळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये संविधानिक अधिकार दिलेला असताना महादेव कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी , मल्हार कोळी, डोंगर कोळी, आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांवर स्वातंत्र्यानंतर सतत अन्याय होत राहिला.
आता या अन्यायाचा कळस झाला आहे. नोकरदारांना अकरा महिन्याची नोटीस देऊन पूर्णपणे पारतंत्र्यात टाकले आहे. समाजातील तरुणांसमोर नोक-यांचा तर नोकरदारांना बेरोजगार होण्याचा प्रश्न सतावत आहे. कोणत्याही प्रकारे शासन आणि प्रशासन कोळी समाजाला सहकार्य करीत नसल्याचे दिसत आहे. शासनाने लवकरात लवकर आमची जात दाखवावी, आम्हाला महादेव कोळीचे प्रमाणपत्र विनासायास लवकरात लवकर मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. जर या मोचार्नंतर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास शेवटी आम्हाला इच्छामरण घेण्याची शासनाने परवानगी द्यावी ही शासनाला आमची विनंती आहे. तरी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा नाही येथून पुढील काळात आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.