महापालिकेविरूद्ध आता रस्त्यावर उतरा
By admin | Published: June 9, 2016 11:12 PM2016-06-09T23:12:44+5:302016-06-10T00:21:43+5:30
जयंत पाटील : सांगलीत राष्ट्रवादीचा मेळावा
सांगली : महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधाऱ्यांतील भांडणावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे शहरातील विकास कामांचे वाटोळे झाले असून, पालिकेतील चुकीच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.
येथील दीनानाथ नाट्यगृहात सांगली विधानसभा क्षेत्र कार्यकर्त्यांचा मेळावा व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, लीलाताई जाधव उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस विकासात अपयशी ठरली आहे. लोकांची सेवा सक्षमपणे केली जात नाही. सत्ताधाऱ्यांतच इतकी भांडणे आहेत की, त्यावर कुणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. त्यांच्यातील गटबाजीच्या राजकारणाने शहराचे वाटोळे झाले आहे. पिण्याचे पाणी, डास, गटारी, ड्रेनेज, घरकुलांचे पुनर्वसन, कचऱ्याचा प्रश्न घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. शहराचा विकास खोळंबला आहे. त्यासाठी विधानसभा क्षेत्र व शहरातील युवक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या चुकीच्या निर्णयाला विरोध करावा. पुढील निवडणुकीत महापालिकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत.
राष्ट्रवादीतील असंख्य कार्यकर्त्यांतून पदाधिकारी निवडी झाल्या आहेत. पदे काम करण्यासाठी दिली जातात. पक्षवाढीसाठी कोणी योगदान देणार नसेल, तर त्याचे पद काढून घेतले जाईल. आपण विरोधी पक्षात आहोत, हे कार्यकर्त्यांनी विसरू नये. महापालिका निवडणुकीसाठी अजून दोन वर्षे आहेत. कार्यकर्त्यांनी प्रभागात पक्षाची बांधणी करावी. ऐनवेळी पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असेही पाटील म्हणाले.
यावेळी नगरसेवक विष्णू माने, युवराज गायकवाड, आशा शिंदे, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, वसुधा कुंभार, राहुल पवार, मनोज भिसे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांना डोस : पालिकेवर टीकास्त्र
महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा सावळागोंधळ सुरू आहे. विरोधी राष्ट्रवादीची टीम सत्ताधाऱ्यांविरोधात काम करीत आहे. जनता व कार्यकर्त्यांची भेट रस्त्यावर झाली पाहिजे. तशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. संयमाने बोलले तर जनता प्रतिसाद देते. वाट्टेल तसे बोललो तर काय होते, हे सर्वांनाच माहीत आहे, असा चिमटाही कार्यकर्त्यांना काढला.