आता काकू-पुतण्याचं राजकारण पहा

By admin | Published: January 18, 2015 12:28 AM2015-01-18T00:28:20+5:302015-01-18T00:28:52+5:30

अजित पवार : इस्लामपुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला टोला

Now look at the politics of cousin-nepotism | आता काकू-पुतण्याचं राजकारण पहा

आता काकू-पुतण्याचं राजकारण पहा

Next

इस्लामपूर : राज्यात भाजपचीच सत्ता असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देत आहेत. राज्यातील जनतेने आजवर काका-पुतण्याचे राजकारण पाहिले आता काकू-पुतण्याचे राजकारण पहावे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी इस्लामपूर येथील कार्यक्रमात लगावला.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३१ व्या पुण्यतिथीनिमित्त इस्लामपूर नगरपालिकेने बांधलेल्या घरकुले व व्यापारी संकुलाचे उद्घाटन आणि राजारामबापू सहकारी बॅँकेने उत्तयदायित्व घेतलेल्या शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव धान्याची माहिती मोबाईल संदेशाद्वारे (एसएमएस) देण्याच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन पवार यांच्याहस्ते करण्यात आले. माजी मंत्री आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी १० कुटुंबांना घरकुलाच्या चाव्यांची प्रतिकृती प्रातिनिधिक स्वरुपात पवार यांच्याहस्ते देण्यात आली. त्यानंतर पालिकेच्या ताकारी रस्त्यावरील खुल्या नाट्यगृहात झालेल्या जाहीर कार्यक्रमात आ. पवार बोलत होते.
ते म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजप सरकारने सत्तेवर येण्यासाठी माध्यमांचा प्रभावी वापर करीत खोटी आश्वासने देऊन जनतेची घोर फसवणूक व निराशा केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० दिवसात परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्वासन दिले. त्यातून प्रत्येक कुटुंबाला १५ ते १६ लाख रुपये मिळतील, असे दिवास्वप्न दाखवले. आज २५० दिवस झाले तरी, हा काळा पैसा परत आलेला नाही.
विधानसभा निवडणुकीवेळी पुन्हा हीच पध्दत वापरत एलबीटी हटवू, टोल हटवू, अशा खोट्या वल्गना करीत राज्यातही भाजपने सत्ता हस्तगत केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस या टोलप्रश्नी आंदोलनाचा इशारा देत आहेत. गृह खाते त्यांच्याकडेच आहे. नागपुरात दिवसाढवळ्या मुडदे पडत आहेत. मुलींची छेडछाड होते आहे; मात्र तरीही त्यांना कायदा व सुव्यवस्थेशी देणे-घेणे नाही, असा आरोप पवार यांनी केला.
आ. जयंत पाटील म्हणाले की, बापूंचे पुण्यस्मरण चांगल्या विकासाभिमुख कामाने करण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे. शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून सामान्य कुटुंबांना हक्काची घरकुले देण्याच्या उपक्रमाचा आनंद आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून शहराला सुंदर बनवण्याचा प्रयत्न केला. सामान्य माणसांना त्रास होणार नाही, यासाठी रास्त भाव धान्याची माहिती देणारी कार्यप्रणाली सुरू केली. राजकारणात उन्हाळे-पावसाळे येत असतात. बापूंचे कार्यकर्ते त्यातून तावून-सुलाखून निघालेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम करू. काहीजण इकडे-तिकडे गेले; मात्र नगाला नग देण्याची क्षमता राष्ट्रवादीत आहे.
राजारामबापू बॅँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी बॅँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी स्वागत, तर उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी आभार मानले. यावेळी दिलीपराव पाटील, विलासराव शिंदे, माणिकराव पाटील, पी. आर. पाटील, नेताजीराव पाटील, विनायकराव पाटील, जनार्दन पाटील, जि. प. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, अरुण लाड, रामराव देशमुख, बी. के. पाटील, रवींद्र बर्डे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Now look at the politics of cousin-nepotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.