वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी आता दोनच केंद्रांचा पर्याय, ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात
By अविनाश कोळी | Published: February 13, 2024 12:52 PM2024-02-13T12:52:11+5:302024-02-13T12:52:50+5:30
जात प्रमाणपत्र जोडावे लागणार नाही
अविनाश कोळी
सांगली : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या ‘नीट २०२४’साठीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून दि. ९ मार्च २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. यंदाच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत. पूर्वी चार परीक्षा केंद्रांचे पर्याय निवडता येत होते. आता दोनच केंद्रांचे पर्याय असतील. याशिवाय अर्जासोबत जोडावा लागणारा जातीचा दाखला आता प्रवेशावेळी सादर करण्याची मुभा आहे.
संपूर्ण देशात ५ मे २०२४ रोजी दुपारी २ ते ५.२० या वेळेत ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. सर्वाधिक परीक्षार्थी असणारी ‘नीट’ ही देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा आहे. गतवर्षी २० लाख ८७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केला होता. यंदा २२ लाखांहून अधिक विद्यार्थी नीट परीक्षा देतील, असा अंदाज आहे.
यंदा प्रवेश प्रक्रियेत या गोष्टी बदलल्या
- यापूर्वी चार परीक्षा केंद्र द्यायला लागायचे त्याऐवजी या वर्षापासून फक्त दोनच परीक्षा केंद्र द्यावे लागणार असून त्यापैकी एक परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र जोडावे लागत असे, या वर्षापासून ते जोडावे लागणार नाही. मात्र वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना ते सादर करावे लागणार आहे.
महाराष्ट्रात ३४ परीक्षा केंद्र
इंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषेत नीट परीक्षा देता येणार असून यासाठी देशभरात ५५४ केंद्र असणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात ३४ परीक्षा केंद्र आहेत. नीट परीक्षेचा निकाल १४ जून २०२४ रोजी जाहीर केला जाणार आहे.
नीट परीक्षेचा फॉर्म विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक भरावा. तसेच आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे योग्य त्या आकारात अपलोड करावीत. नीट परीक्षेसाठी भरली जाणारी माहिती नंतर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करताना आहे तशी वापरली जाते. त्यामुळे नीट परीक्षेसाठी अर्ज करताना केली जाणारी एखादी चूक वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर विपरीत परिणाम करू शकते. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली