आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा

By संतोष भिसे | Published: October 31, 2022 04:29 PM2022-10-31T16:29:59+5:302022-10-31T16:30:25+5:30

विद्यार्थ्यांनी कालसुसंगत शिक्षणक्रम सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Now students will decide the syllabus of ITI | आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा

आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा

Next

सांगली : आयटीआयमध्ये कोणते विषय शिकविले जावेत याची निवड आता विद्यार्थ्यांवरच सोपविण्यात आली आहे. विषय सुचविण्यासाठी १ ते ११ नोव्हेंबरदरम्यान रितसर स्पर्धाही जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कालसुसंगत शिक्षणक्रम सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय व खासगी आयटीआयमध्ये सध्या विविध प्रकारचे ४० शिक्षणक्रम शिकविले जातात. त्यापैकी मोजके दहा-बारा ट्रेडच लोकप्रिय आहेत.  तरीही यावर्षी सर्वच शासकीय आयटीआयमधील सर्वच ट्रेडचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याच्या काळात विद्यार्थ्यांना नवनवी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन आयटीआयमध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला. स्वत: शिक्षणक्रम तयार करुन विद्यार्थ्यांपुढे ठेवण्याऐवजी त्यांनाच निर्णयाची संधी देण्यात आली.

`सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम` ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली. राज्यातील प्रत्येक तालुक्यातून सर्वोत्कृष्ट विषयानुसार एका विद्यार्थ्याची निवड केली जाईल. त्यासाठी तेथील प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त केली आहे. तालुकास्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांमधून १८ व १९ नोव्हेंबररोजी जिल्हास्तरीय निवड केली जाईल. सर्वोत्कृष्ट संकल्पना असलेल्या तिघांची निवड होईल. त्यांना अनुक्रमे ५०००, ३००० व २००० रुपयांची बक्षिसे दिली जातील.

यावर शिक्षणक्रम अपेक्षित आहेत

शेती, स्वयंरोजगार, महिलांचे रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यासक्रम व अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुचवता येतील. तो कसा उपयुक्त आहे हेदेखील सांगायचे आहे.

शिक्षणक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थी लगेच स्वत:च्या पायावर उभा राहणे अपेक्षित आहे. त्यासाठी समाजात गरज असलेल्या विषयांचे शिक्षणक्रम सुरु केले जाणार आहेत. त्यासाठी समाजातूनच विषय यावेत असा स्पर्धेमागील हेतू आहे. - व्ही. बी. देशपांडे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली

Web Title: Now students will decide the syllabus of ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.