आता रात्रीही अतिक्रमणांवर कारवाई ! : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By admin | Published: January 8, 2016 11:37 PM2016-01-08T23:37:56+5:302016-01-09T00:54:19+5:30

शुक्रवारअखेर महापालिका क्षेत्रातील १३९४ -कुपवाडमध्ये ७८ अतिक्रमणांवर हातोडा प्रभाग तीनची कारवाई : शहरातील मुख्य चौकांनी घेतला मोकळा श्वास

Now take action against encroachments at night! : Collector's order | आता रात्रीही अतिक्रमणांवर कारवाई ! : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आता रात्रीही अतिक्रमणांवर कारवाई ! : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next

सांगली : कारवाईच्या भीतीने दिवसभर गायब झालेले विक्रेते, हातगाडीवाले सायंकाळनंतर मात्र पुन्हा रस्त्यावर येतात. त्यासाठी आता सायंकाळी सहा ते नऊ या वेळेतही अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. गेल्या दोन आठवड्यात महापालिकेच्या पथकाने सांगलीत ९२८, तर मिरज व कुपवाडमधील ४६६, अशी १३९४ अतिक्रमणे हटविली आहेत.
सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू आहे. सांगलीच्या बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविल्यानंतर आता पथकाने शंभरफुटी रस्ता मोकळा करण्याची कारवाई हाती घेतली आहे. महापालिकेच्या पथकाने मोकळे केलेल्या रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमणे होऊ लागली आहेत. सकाळी पथक अतिक्रमण काढलेल्या मार्गावरून जाते. तेव्हा रस्त्यावर हातगाडी, फळे, भाजी विक्रेते गायब असतात. पथक पुढे जाताच पुन्हा अतिक्रमणांचा विळखा पडलेला असतो. दिवसभर गायब असलेले हातगाडी, फेरीवाले सायंकाळनंतर मात्र रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
जिल्हाधिकारी गायकवाड यांनी शुक्रवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा आढावाही घेण्यात आला. सायंकाळनंतर होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्याचे आदेश गायकवाड यांनी दिले आहेत. सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत हे पथक शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करणार आहे.
शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने शंभरफुटी रस्त्यावरील अतिक्रमण हटावचा धडाका कायम ठेवला होता. दिवसभरात ८७ अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला. रस्त्यावरील ४० ठिकाणच्या मातीचे भराव जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्यात आला. वाहतुकीला अडथळा ठरणारी सहा वाहने क्रेनच्या साहाय्याने हटविली. त्याशिवाय डिजिटल फलक, लोखंडी साहित्य, हातगाडी, स्लॅब, कट्टे, गटार व रस्त्यावरील छपऱ्या हटविण्यात आल्या. (प्रतिनिधी)


सुतार प्लॉटमध्ये झोपड्या : कारवाई होणारच
सांगली बसस्थानकाच्या पिछाडीस असलेल्या सुतार प्लॉटमधील खुल्या भूखंडावर सात झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण केले होते. गेली पंधरा वर्षे या अतिक्रमणासाठी न्यायालयीन लढाई सुरू होती. सांगली जिल्हा न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरोधात मालमत्ताधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. काही महिन्यांपूर्वी याचिकाकर्त्यांनी न्यायालयातून माघार घेतल्याने, शुक्रवारी महापालिकेच्या पथकाने या खुल्या भूखंडावरील झोपड्या हटविण्याची कारवाई केली. याठिकाणच्या तीन झोपड्या हटविण्यात आल्या. उर्वरित चार जणांनी पर्यायी व्यवस्था करण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत मागून घेतली आहे. त्यांनी सोमवारी झोपड्या हटविल्या नाहीत, तर कारवाई करण्याचा इशारा पथकाने दिला आहे.

Web Title: Now take action against encroachments at night! : Collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.