आता लक्ष्य सीईटी परीक्षा, अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ओढा ग्रामीण भागाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:18 AM2021-07-21T04:18:30+5:302021-07-21T04:18:30+5:30
संतोष भिसे लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : दहावीच्या बंपर निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ...
संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहावीच्या बंपर निकालानंतर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात प्रवेशासाठी सीईटी होणार असून त्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक शासनाकडून जाहीर केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांचा कल पाहता, प्रवेशासाठी त्यांनी ग्रामीण भागाला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे एसटीची वाहतूक बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामांसाठी शहरांकडे महाविद्यालयात येता आले नाही. अत्यावश्यक कामासाठी येताना बरीच कसरत करावी लागली. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. या स्थितीत शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेतला तरी, विद्यार्थ्यांना पुन्हा गावाकडेच अडकून पडावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गावाकडील महाविद्यालयांनाच प्राधान्य दिल्याचे आढळत आहे. त्यामुळे ग्रामीण महाविद्यालये यंदा फुल्ल होण्याची चिन्हे आहेत.
बॉक्स
यंदाही अकरावी रेस्ट ईयरच
अकरावीचे वर्ष विद्यार्थी रेस्ट इयर मानतात. कोरोनामध्ये तर खऱ्याअर्थाने ते रेस्ट ईयरच ठरले. यावर्षीही वर्ग सुरू होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विद्यार्थी गावातच थांबण्याच्या मानसिकतेत आहेत.
कोट
यावर्षी गावातच थांबणार
गेले वर्षभर महाविद्यालये बंद असल्याने चांगला अभ्यास झाला नाही. येणाऱ्या वर्षात काय होईल याची निश्चिती अद्याप नाही. त्यामुळे गावातच प्रवेश घेणार आहे.
- ओंकार सावंत, विद्यार्थी, एरंडोली
डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा होता, पण यावर्षीही तिसऱ्या लाटेत महाविद्यालये बंद राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गावातच प्रवेश घेणार आहे.
- स्नेहा आळतेकर, विद्यार्थिनी, अंकली.
सीईटीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया
अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. प्रवेशासाठी ऑगस्ट महिन्यात सीईटी होणार आहे. तिचा निकाल लागल्यानंतर शासनाकडून अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. सीईटी सक्तीची नाही. दहावीचा निकाल चांगला लागल्याने अकरावीचे सर्व शाखांचे प्रवेश यावर्षी फुल्ल होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीही चांगल्या निकालाने अकरावीला प्रतिसाद होता.
- पोपट मलगुंडे, निरीक्षक, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद
पॉईंटर्स
अकरावीला प्रवेश देणारी महाविद्यालये : २३८, एकूण जागा : ४३,७४०, गेल्यावर्षी किती अर्ज आले : ४१,०००, कितीजणांनी प्रवेश घेतला : ३८,२४०, किती जागा रिक्त राहिल्या : ५५००.