आता आरोग्य विभागही घेणार तुमच्या कुटुंबातील गर्भवतीची काळजी, प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत कमी करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 04:38 PM2022-12-19T16:38:11+5:302022-12-19T16:38:50+5:30

जिल्ह्यात वर्षाकाठी सरासरी ४५ हजार बालके जन्मतात. त्यातील किमान १० टक्के अतिजोखमीच्या ठरतात.

Now the health department will also take care of the pregnant women in your family | आता आरोग्य विभागही घेणार तुमच्या कुटुंबातील गर्भवतीची काळजी, प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत कमी करण्याचा प्रयत्न

संग्रहीत फोटो

googlenewsNext

सांगली : तुमच्या कुटुंबातील गर्भवतीची काळजी आता जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही घेणार आहे. यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले असून, गर्भवतींशी संपर्क करून प्रकृतीविषयी सल्ला, चौकशी व मार्गदर्शन दिले जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व आरोग्याधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम महिन्याभरापूर्वी सुरू करण्यात आला. आजवर दीड हजार गर्भवतींशी संपर्क करण्यात आला आहे. दररोज प्रत्येक तालुक्यातील १० ते १५ गर्भवतींशी संपर्क साधण्यात येतो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली जाते. आहारविषयक सल्ला दिला जातो. औषधांचा वापर, होणारा त्रास, रक्तदाब आणि मधुमेह, अन्य आजार यांची माहिती घेतली जाते. त्यावर उपचारांसाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्काचा सल्ला दिला जातो. 

प्रसंगी जवळच्या सरकारी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना गर्भवतीशी संपर्क साधून मदतीची सूचना केली जाते. या उपक्रमातून अतिजोखमीच्या प्रसूतींची नोंद घेण्याचा प्रयत्न आहे. जास्त वयात प्रसूती, अपुऱ्या दिवसांचा गर्भ, जास्त संख्येने बाळंतपणे या श्रेणीतील गर्भवती अतिजोखमीच्या ठरतात. कॉल सेंटरवरील समुपदेशनाद्वारे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाईल. आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे.

वर्षाकाठी ४५ हजार प्रसूती

जिल्ह्यात वर्षाकाठी सरासरी ४५ हजार बालके जन्मतात. त्यातील किमान १० टक्के अतिजोखमीच्या ठरतात. गर्भावस्थेच्या काळातच त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवून प्रसूतीदरम्यानची गुंतागुंत कमी करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.

Web Title: Now the health department will also take care of the pregnant women in your family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.