सांगली महापालिकेच्या उपमहापौरांसाठी आता अलिशान गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:48 PM2018-10-16T13:48:45+5:302018-10-16T13:50:38+5:30
सांगली महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना उपमहापौरांसाठी अलिशान कार खरेदीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सांगली : महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना उपमहापौरांसाठी अलिशान कार खरेदीचा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेसमोर ठेवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचाविल्या आहेत. यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगरसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती अजिंक्य पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होणार आहे. स्थायीच्या दुसऱ्या सभेपासून सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उधळपट्टी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
उपमहापौर धीरज सुर्यवंशी यांच्याकडील सध्याचे वाहन सतत नादुरूस्त होत असल्याचे कारण पुढे करत त्यांना अलिशान कार खरेदीचा प्रस्ताव सभेत आला आहे. त्यासाठी दहा लाखांचा खर्च केला जाणार आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. विकासकामे ठप्प आहेत. ठेकेदारांची देणी थकली आहे. पण त्याचे भाजपला काहीस सोयरसुतक नाही. उलट पैशाची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला आहे. त्यामुळे स्थायीत हा विषय वादळी होण्याची शक्यता आहे. तसेच सांगलीवाडी येथील खोके हस्तांतर, २२ कंत्राटी वाहनचालकांना सहा महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्याचा विषयही सभेत आला आहे.
याशिवाय अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर बांधण्यासाठी नकाशे व आराखडे तयार करण्याच्या विषयाला मान्यता मिळण्यासाठी स्थायीत प्रस्ताव आला आहे. सावित्रीबाई फुले वाचनालयातर्फे घेण्यात येणारी शारदीय व्याख्यानमालेसाठी पन्नास हजार रुपये खर्चास मान्यता व नियोजन करण्यासाठी दोन सदस्यांची समिती नियुक्त करण्याचा विषय सभेत आला आहे. यावर स्थायीत चर्चा होणार आहे.