‘भारत जोडो’बरोबर आता ‘संविधान बचाओ’ यात्रा, योगेंद्र यादव यांची उद्या सांगलीत सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 12:35 PM2022-11-01T12:35:23+5:302022-11-01T12:35:42+5:30

कोल्हापूरपासून योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेला सुरुवात होणार

Now with Bharat Jodo Savidhan Bachao Yatra, Yogendra Yadav meeting in Sangli tomorrow | ‘भारत जोडो’बरोबर आता ‘संविधान बचाओ’ यात्रा, योगेंद्र यादव यांची उद्या सांगलीत सभा

‘भारत जोडो’बरोबर आता ‘संविधान बचाओ’ यात्रा, योगेंद्र यादव यांची उद्या सांगलीत सभा

Next

सांगली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘नफरत छोडो, भारत जोडो’ यात्रेला पाठिंबा देण्यासाठी ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियानाचे आयोजन केले आहे. अभियानाअंतर्गत ज्येष्ठ विचारवंत व शेतकरी नेते योगेंद्र यादव यांची २ नोव्हेंबर रोजी सांगलीत सभा आयोजित केल्याची माहिती काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, भाजप व आरएसएसच्यावतीने अत्यंत चुकीच्या पद्धतीने विकृत इतिहास, जातीय, धार्मिक द्वेष पसरवून भारतीय संविधानाच्या लोकशाही धर्मनिरपेक्ष मूल्यांना उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. अशावेळी सर्व संविधानप्रेमी व लोकशाहीवादी पक्ष, संघटना एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे. भाजप वगळता अन्य बहुतांश पक्ष, सामाजिक व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत राहुल गांधी यांच्या यात्रेला पाठिंबा दिला आहे.

सांगलीतील सर्व पक्ष, संघटनांच्या सहभागाने ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ अभियान सुरू करण्यात आले आहे. दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रात येणाऱ्या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासाठी २ ते ७ नोव्हेंबर ‘नफरत छोडो, संविधान बचाओ’ यात्रा आयोजित केली आहे.
कोल्हापूरपासून योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सांगलीमध्ये येत आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करून यात्रेचे स्वागत होईल. त्यानंतर जुना स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत यात्रा निघणार असून स्टेशन चौकातच योगेंद्र यादव यांची सभा होणार आहे, असे पाटील म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, शंभूराज काटकर, कॉ. शंकर पुजारी, ॲड. अजित सूर्यवंशी, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, विकास मगदुम आदी उपस्थित होते.

या पक्ष, संघटनांचा सहभाग

काँग्रेससह, राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्र सेवादल, विद्रोही सांस्कृतिक साहित्य चळवळ, सेक्युलर मुव्हमेंट, माकप, शेकाप, रेशनिंग कृती समिती आदींचा अभियानात समावेश आहे.

Web Title: Now with Bharat Jodo Savidhan Bachao Yatra, Yogendra Yadav meeting in Sangli tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली