आता एका क्लीकवर मिळणार रेशनकार्डची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:07+5:302021-03-23T04:28:07+5:30
सांगली : शासनाच्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंबसह केशरी कार्डधारकांना आपल्या रेशनकार्डविषयक माहितीसाठी आता तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. शासनाने नुकतेच लाॅंच ...
सांगली : शासनाच्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंबसह केशरी कार्डधारकांना आपल्या रेशनकार्डविषयक माहितीसाठी आता तंत्रज्ञानाची मदत होणार आहे. शासनाने नुकतेच लाॅंच केलेल्या ‘मेरा रेशन’ या ॲपच्या माध्यमातून रेशनकार्डधारक आपली माहिती केवळ एका क्लिकच्या माध्यमातून बघणार आहेत. जिल्ह्यातीलही सर्व माहिती यावर उपलब्ध आहे.
रेशनकार्डधारकांना आपल्या कार्डवर किती धान्य देण्यात आले यासह दुकानाची माहिती आवश्यक असते. त्यातही धान्य खरेदीतील पारदर्शकता दिसण्यासाठी आता या ॲपची मदत होणार आहे. स्वस्त धान्याची उपलब्धता व त्याची सद्यस्थिती कळणार असल्याने कार्डधारकांची पायपीट थांबणार आहे.
सध्या सर्वच घटकातील प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन आला आहे. त्यामुळे या ॲपचा सहज उपयोग करता येऊ शकतो, हे ओळखून केंद्र सरकारने मोहीम सुरू केली आहे. केंद्र सरकारने हाती घेतलेल्या ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ अभियानांतर्गत ही तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली आहे.
रेशनकार्डधारकांना आपल्या निवासाच्या पत्त्यात बदल करायचा असल्यास यापूर्वी कार्यालयात जावे लागत होते. आता या ॲपवर माहिती भरून आपल्याला हवे ते ठिकाण निवडता येणार आहे. त्यासाठी आपल्या जवळचे स्वस्त धान्य दुकान कोणते, याची माहिती मिळण्यासाठीही ‘गुगल मॅप’चा वापर करता येणार आहे. तसेच संबंधित स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध असलेले धान्य व इतर सुविधांचीही माहिती मिळणार असल्याने कार्डधारकांची सोय होणार आहे.
चौकट
जिल्ह्यातील एकूण लाभार्थी ४,०५,८७३
अंत्योदय ३१,३६५
प्राधान्य कुटुंब ३,७४,५०८
चौकट
तक्रार नोंदवता येणार
रेशनकार्डधारकांना आपली कोणतीही तक्रार असेल तर यापूर्वी कार्यालयात यावे लागत होते. तिथेही कामाबाबत अडचणी सोडवणुकीला वेळ लागण्याचीच शक्यता होती. त्यामुळे आता या ॲपवरच तक्रार नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे धान्याची उपलब्धता अथवा इतर कोणतीही तक्रार असल्यास ॲपवर नोंदवता येणार आहे.
चौकट
क्लिकवर मिळणार ही माहिती
लाभार्थ्यांना मिळणारे धान्य जवळपास असलेले रास्त भाव दुकान शिधापत्रिकेवर उचलण्यात आलेल्या धान्याची माहिती, शिधापत्रिका पात्र की अपात्र याची माहिती एका क्लीकवर मिळणार आहे. यामुळे लाभार्थींना किरकोळ कामासाठी तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तकारदेखील नोंदवता येणार आहे.
कोट
शिधापत्रिकाधारकांची या ॲपमुळे चांगली सोय होणार आहे. याशिवाय आपल्या कार्डवर झालेले व्यवहारही कळणार असल्याने गैरव्यवहारांना आळा बसणार आहे. सर्व कार्डधारकांनी याचा लाभ घ्यावा.
- वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी