स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जा उपयुक्त : संजय उपाध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 09:47 PM2019-01-16T21:47:58+5:302019-01-16T21:49:53+5:30
मानवी जीवनाच्या समृध्दीसाठी अणुऊर्जेच्या वापराशिवाय पर्याय नाही. भारताला आधुनिक शेती आणि विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी अणुऊर्जा तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानाचा प्रसार
इस्लामपूर : मानवी जीवनाच्या समृध्दीसाठी अणुऊर्जेच्या वापराशिवाय पर्याय नाही. भारताला आधुनिक शेती आणि विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी अणुऊर्जा तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानाचा प्रसार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचायला हवा, असे प्रतिपादन लेखक, तत्त्वज्ञ डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.
येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी व मुंबईच्या भाभा परमाणू संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘शांती, शक्ती आणि समृध्दीसाठी अणुऊर्जा’ या विषयावरील प्रदर्शन आणि चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. उपाध्ये यांच्याहस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. माजी कुलगुरु डॉ. एस. एच. पवार, भाभा केंद्राचे आर. के. सिंग, नियामक मंडळाचे सदस्य प्रा. शामराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष शामरावकाका पाटील, सचिव प्रा. आर. डी. सावंत, संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आर. के. सिंग म्हणाले, अणुऊर्जेच्या विकासविषयक वापरावर आपण भर द्यायला हवा. अणुऊर्जेपासून होणाऱ्या वीज निर्मितीला अज्ञानातून होत असलेला विरोध अनाकलनीय आहे. वास्तविक अणुउर्जेबाबत असलेले गैरसमज दूर करून प्रत्येकाने या नवीन स्रोताचा देशाच्या विकासाकरिता स्वीकार केला पाहिजे.
यावेळी आर.आय.टी.च्या संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. ए. बी. काकडे यांचा सत्कार करण्यात आला.
संचालिका डॉ. सौ. कुलकर्णी म्हणाल्या, जगभरातील तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थ्यांसाठी संशोधनाभिमुख शिक्षण पध्दती अवलंबणारे आर.आय.टी. महाविद्यालय अग्रस्थानी आहे. अणुऊर्जा वापरासंंबंधी जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयाकडून विशेष प्रयत्न होईल.
भाभा परमाणू केंद्राच्या डॉ. एस. टी. म्हेत्रे, डॉ. सुनीता सोनवणे, राजेश पतंगे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. समन्वय समितीचे सदस्य डॉ. ए. बी. काकडे, प्रबंधक राजन पडवळ, सूर्यकांत दोडमिसे यांनी काम पाहिले. डॉ. हेमलता गायकवाड, प्रा. भारती उगळे, प्रा. गौतमी शिंगण यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रतिभा जगताप यांनी आभार मानले.
सायकल रॅली
सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून अणुऊर्जेचा प्रसार आणि प्रचारासाठी सिंग यांच्या उपस्थितीत सायकल रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या या रॅलीची सांगता आर.आय.टी.च्या प्रांगणात झाली.