शहरात दुकानांची वेळ दोनपर्यंत वाढवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:28+5:302021-06-01T04:20:28+5:30
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. लाॅकडाऊनमध्येही रुग्णसंख्या वाढलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने ...
सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. लाॅकडाऊनमध्येही रुग्णसंख्या वाढलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
शहा म्हणाले की, शासनाने १५ जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढविला असला तरी स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिका क्षेत्रात दररोजची २०० पेक्षा अधिक रुग्ण संख्या नाही. शिवाय मृत्यूदरही मर्यादित आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठ सुरू करण्यास पोषक वातावरण आहे. त्यात सांगलीची बाजारपेठ पूरपट्ट्यात येते. लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. बाजारपेठेतील शेकडो दुकाने तळघरात आहेत. त्यामुळे दुकानदारांना तळघरातील साहित्य इतरत्र स्थलांतर करावे लागणार आहे, अन्यथा व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागेल.
शहरातील सर्वच व्यापारी कोरोना नियमांचे पालन करीत आहेत. गेले दोन महिने लाॅकडाऊन असल्याने खर्च कसा भागवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानी द्यावी, अशी मागणीही शहा यांनी केली.