मिरजेत महापालिका शाळेत विद्यार्थी संख्येत दुपटीने वाढ -: लोकसहभाग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:56 AM2019-07-03T00:56:17+5:302019-07-03T00:56:36+5:30
सदानंद औंधे । मिरज : महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत असताना मिरजेतील महापालिकेच्या शाळा क्रमांक अकरामध्ये ई-लर्निंगसह अन्य ...
सदानंद औंधे ।
मिरज : महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत असताना मिरजेतील महापालिकेच्या शाळा क्रमांक अकरामध्ये ई-लर्निंगसह अन्य सुविधांमुळे शैक्षणिक दर्जात वाढ होऊन शाळेच्या विद्यार्थी संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या असून स्कूल बसची व्यवस्था असलेली महापालिकेची ही एकमेव शाळा आहे.
गेल्या काही वर्षात खासगी इंग्रजी शाळेकडे ओढा वाढल्याने महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थीसंख्या कमी होत आहे. विद्यार्थी नसल्याने मिरजेत महापालिकेच्या चार शाळा बंद झाल्या असून २४ शाळांमध्ये विद्यार्थी टिकविण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे. मिरजेतील बुधवार पेठ, कनवाडकर हौद परिसरातील शाळा क्रमांक ११ मध्ये चार वर्षापूर्वी हीच परिस्थिती होती. मात्र या शाळेतील तीन शिक्षकांनी आपल्या परिश्रमाने व पदरमोड करून शाळेला उर्जितावस्था आणली आहे. शाळेत ई-लर्निंगच्या व्यवस्थेसाठी नगरसेविका संगीता हारगे यांनी त्यांच्या निधीतून ई-लर्निंग प्रोजेक्टर दिला. शाळेतील शिक्षकांनी या इ-लर्निंग, स्पोकन इंग्लिश, बुलेट ट्रेन स्पीड वाचन, शब्दांचा डोंगर, वाक्यांचा डोंगर, ज्ञानरचनावाद या उपक्रमांसह विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली आहे.
शाळेतील मुख्याध्यापिका शोभा लोहार, दरगोंडा पाटील व शोभा पाटील यांनी या शाळेचे रूपच बदलून टाकले आहे. गतवर्षी इनरव्हील क्लबने शाळा दत्तक घेऊन शाळा हॅप्पी स्कूल म्हणून घोषित करून मुला-मुलींसाठी हॅन्डवॉश, शाळेसाठी अनुलेखन पाटी, दफ्तर, वह्या, ग्रंथालयासाठी पुस्तके व तीन वर्गात फरशीवर मॅट बसवून दिले. शाळेची प्रगती पाहून शाळेचे पालक अधिकारी आर. जी. रजपूत यांनी डिजिटल साहित्यासाठी दहा हजार रूपये देणगी दिली. उद्योजक अशोक राणावत यांनी शाळेचे रंगकाम करून दिले. तिन्ही शिक्षकांनी स्वखर्चातून दोन वर्गखोल्या डिजिटल केल्या. ई-लर्निंग व ज्ञानरचनावादी साहित्याच्या वापरामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली. स्पोकन इंग्लिश कोर्समुळे शाळेतील मुलांचे इंग्रजी चांगले आहे. विद्यार्थीसंख्या वाढल्याने शिक्षकांनी भाड्याची स्कूल बस व स्कूल व्हॅन सुरू केली आहे.
शाळेसाठी तीन शिक्षक त्यांच्या पगारातून दरमहा २० हजार रूपये खर्च करीत आहेत. २०१६ मध्ये या शाळेची पहिली ते सातवीतील विद्यार्थी संख्या ६९ होती. मात्र गेल्या तीन वर्षात ही संख्या दीडशेवर गेली आहे. दरवर्षी शाळेची पटसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालकांची ही मानसिकता शिक्षणाबाबत बदलत आहे. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेतील सुविधा महापालिका शाळेत मिळत असल्याने, पालक समाधानी आहेत.
पालकांचे : प्रबोधन
विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी या शाळेतील शिक्षकांनी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. खासगी शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठक घेऊन, त्यांना सुविधा व विद्यार्थ्यांची प्रगती दाखविण्यात येते. पालकांच्या घरी जाऊन या शाळेतील विद्यार्थी इंग्रजी वाचनाचे प्रात्यक्षिक करून खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्याची तुलना करतात. यामुळे खासगी शाळेत जाणारे अनेक विद्यार्थी या शाळेत येत आहेत.
मिरजेत महापालिकेच्या शाळा क्रमांक अकरामध्ये ई-लर्निंगसह अन्य सुविधांमुळे शैक्षणिक दर्जा व विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे.