टँकरची संख्या पोहोचली ७० वर...
By admin | Published: February 11, 2016 12:19 AM2016-02-11T00:19:32+5:302016-02-11T00:31:53+5:30
जिल्ह्यात टंचाई वाढली : पन्नास कोटीच्या नळपाणी योजनेचा शासनाकडे प्रस्ताव सादर
अंजर अथणीकर -- सांगली
जिल्ह्यामध्ये टंचाई वाढत असून फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात टँकरची संख्या ७० वर पोहोचली आहे. आणखी वीसहून अधिक टँकरसाठी मागणी आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ३०४ गावे व वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ५० कोटीच्या नळपाणी पुरवठ्याच्या १०४ योजनांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
पावसाने पाठ फिरविल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची तीव्रता जाणवत आहे. जिल्ह्यातील पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. गेले वर्षभर जिल्हा संपूर्ण टँकरमुक्त होता. यावर्षी मात्र आॅक्टोबरपासूनच टँकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सध्या ५७ गावे, ४५१ वाड्या-वस्त्यांवर एकूण ७० टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. टंचाईची झळ १ लाख ५५ हजार लोकसंख्येला बसली आहे. भाडेपट्ट्याने ६३, तर शासकीय ७ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या दररोज १८३ खेपा करण्यात येत आहेत.
योजनेचे प्रस्ताव : मार्चअखेर मंजुरी शक्य...
जानेवारीपासून अनेक गावांतून नळपाणी योजनेसाठी मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ३०४ गावे व वाड्यांमध्ये १०४ नळपाणी पुरवठा योजनांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. यासाठी जवळपास ५० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सादर केला आहे. याला मार्चअखेरपर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ३२ कोटीच्या जूनअखेरपर्यंतच्या टंचाई आराखड्यास मंजुरी घेण्यात आली आहे. मंजुरीनंतर तात्काळ नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.