Sangli: विट्यात नर्सने रूग्णालयातच गळफास घेत संपवले जीवन, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:21 PM2024-12-03T13:21:38+5:302024-12-03T13:21:59+5:30
विटा : येथील एका खासगी रूग्णालयात काम करणाऱ्या अविवाहित नर्सने साडीच्या काठाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी ...
विटा : येथील एका खासगी रूग्णालयात काम करणाऱ्या अविवाहित नर्सने साडीच्या काठाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. नर्सचे काम करीत असलेल्या रूग्णालयातील खोली नं. १४ मध्ये आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. साक्षी गौरव पवार (वय २१, रा. मोही, ता. खानापूर) असे आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे.
मोही येथील साक्षी पवार ही विटा येथील साळशिंगे रस्त्यावरील एका खासगी रूग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून काम करीत होती. रविवारी दुपारी जेवण करण्यासाठी जाते, असे म्हणून साक्षी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रूग्णालयाच्या १४ क्रमांकाच्या खोलीत गेली. दुपारी ३ वाजले तरी परत कामावर आली नसल्याने अन्य कर्मचाऱ्यांनी खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला.
त्यावेळी साक्षी हिने छताच्या पंख्याला साडीच्या काठाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साक्षीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विटा ग्रामीण रूग्णालयात पाठविला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची विटा पोलिसांत नोंद झाली असून पोलिस तपास करीत आहेत.
साक्षीच्या एक्झिटमुळे मोहीत हळहळ..
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार साक्षी पवार हिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. आई आजारी असल्याने तिच्या लहान भावंडाचा शाळेचा व घरखर्च साक्षीच्या पगारातून चालत होता. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत घर,भावंडे सांभाळून ती नोकरी करीत होती. त्यामुळे तिच्या अशा अचानक झालेल्या एक्झिटमुळे मोही गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.