नर्सिंग काॅलेजमुळे डोंगरी भागातील विद्यार्थ्यांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:25 AM2021-03-19T04:25:37+5:302021-03-19T04:25:37+5:30
फोटो ओळ:- शिराळा येथे मातोश्री हिराई देशमुख इन्स्टिट्यूटमध्ये बी. एस. सी. नर्सिंग विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी सत्यजित देशमुख यांनी मार्गदर्शन ...
फोटो ओळ:- शिराळा येथे मातोश्री हिराई देशमुख इन्स्टिट्यूटमध्ये बी. एस. सी. नर्सिंग विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी सत्यजित देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा येथील नर्सिंग कॉलेजमुळे डोंगरी व ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. या शिक्षण संकुलामध्ये दर्जेदार शिक्षण घेऊन चांगले विद्यार्थी घडतील, असे प्रतिपादन निनाईदेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले.
येथील शिवाजीराव देशमुख शिक्षण संकुलामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या मातोश्री हिराई देशमुख इन्स्टिट्यूट बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी ते बोलत होते. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे नवनवीन कोर्सेस सुरू करण्याच्या दृष्टीने या शिक्षण संस्थेची वाटचाल सुरू आहे. नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून या विभागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये कामगिरी करता येणार आहे. वाढत चाललेली रोगराई, त्याच्या तुलनेत असणारी हॉस्पिटल्स व वैद्यकीय सेवांची कमतरता पाहता या क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे. बीएससी नर्सिंगबरोबरच ए. एन. एम. नर्सिंग कोर्स सुरू करण्यात आलेले आहेत. याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, प्राचार्य महावीर पाटील, डॉ. मनोज महिंद, डॉ. कैलास पाटील, प्राध्यापक प्रकाश कुमार उपस्थित होते.