ओबीसी मंत्र्यांनी समाजा-समाजात भांडणे लावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:25 AM2021-03-21T04:25:10+5:302021-03-21T04:25:10+5:30
सांगली : विद्यमान सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचे काम केले, असा आरोप भाजपच्या ओबीसी मोर्चाचे ...
सांगली : विद्यमान सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचे काम केले, असा आरोप भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केला.
भाजपच्या सांगली जिल्हा ओबीसी मोर्चातर्फे गणेशनगर येथील रोटरीच्या सभागृहात ओबीसी मोर्चाच्या पदाधिकारी व नूतन मंडल कार्यकारिणी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा ॲड. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर यांनी करताना मेळाव्याचा उद्देश विषद करून आगामी काळात ओबीसी मोर्चा आपले काम अधिक प्रभावीपणे करेल अशी ग्वाही दिली.
टिळेकर म्हणाले की, भाजप ओबीसी समाजाच्या नेहमीच पाठीशी राहिला आहे. १९५१ पासून आरक्षण मागत असताना काँग्रेसने त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले. मंडल आयोगाच्या शिफारसी काँग्रेस सरकारने दप्तरी ठेवल्या. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक म्हणजे ३८ आमदार ओबीसी आहेत. भाजप सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबाबत महाआघाडी सरकारने न्यायालयात बाजू व्यवस्थित न मांडल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली. ११ एप्रिलला आम्ही फुले वाड्यातून ओबीसी हक्क परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंढे, सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सुरू करणार आहोत.
आमदार पडळकर म्हणाले की, राज्यातील महाआघाडी सरकार विश्वासघाताने आलेले आहे. भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले. ओबीसी आणि मराठ्यांच्यात काहीजण भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती म्हणजे सरकारचे अपयश आहे.
यावेळी विलास काळेबाग, प्रकाश गधळे, धोंडीराम इंगवले, दीपक माने, राहुल माने, वीणा सोनवलकर, मिलिंद कोरे, परशुराम नागरगोजे, प्रमोद धायगुडे आदी उपस्थित होते.