दुष्काळी फोरमसमोर अडथळे
By admin | Published: July 17, 2014 11:25 PM2014-07-17T23:25:55+5:302014-07-17T23:38:50+5:30
विधानसभा निवडणूक : भाजप-सेनेच्या भांडणाचा परिणाम
अविनाश कोळी - सांगली
भाजप-सेनेच्या भांडणामुळे भाजपवर प्रेम असलेल्या दुष्काळी फोरमच्या काही नेत्यांची संभ्रमावस्था वाढली आहे. भाजपवर प्रेम असले तरी, काहींना सेनेशी विवाह करावा लागणार आहे, तर काहींना भाजपशी लग्नाची संधी असूनही पक्षांतर्गत विरोधामुळे प्रवेशालाच सासुरवास भोगावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक मोठा गट सध्या महायुतीच्या प्रेमात पडला आहे. त्यांना पक्षप्रवेशाचे वेध लागले आहेत. एकूण आठ विधानसभा मतदार संघापैकी शिराळा, सांगली, तासगाव-कवठेमहांकाळ, जत, पलूस-कडेगाव या ठिकाणचे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते महायुतीत येण्यास इच्छुक आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ, जत आणि पलूस-कडेगाव या तीन मतदारसंघात सध्या दुष्काळी फोरमचे नेते प्रवेशाच्या उंबरठ्यावर आहेत. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे.
अजितराव घोरपडे, विलासराव जगताप आणि पृथ्वीराज देशमुख यांची पहिली पसंती भाजपला होती. तरीही शिवसेनेने पाच जागांवर दावा केल्यामुळे पक्षप्रवेश करू इच्छिणाऱ्या या नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. मोठ्या नेत्यांना विधानसभा लढवायची असेल तर त्यांनी शिवसेनेतर्फे लढावे, असे आवाहनही आता शिवसेनेचे नेते करीत आहेत.
कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेल्या या नेत्यांपैकी काहींनी प्रसंगी शिवसेनेतून लढण्याची मानसिकता तयार केली आहे. तरीही ज्या पक्षात ते जाऊ पहात आहेत, त्या पक्षातील निष्ठावंत गटाचा त्यांना विरोध होत आहे. लोकसभा निवडणुकीवेळीही हाच अनुभव संजय पाटील यांना आला. त्यातच कुंपणावरील या नेत्यांची पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यामुळे, कुठे जायचे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
विधानसभा निवडणुका जवळ येत असल्या तरी, महायुती व आघाडीचे जागावाटप झालेले नाही. त्यामुळे नेमकी राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने करायची, याचा निर्णय घेताना नेत्यांची संभ्रमावस्था वाढली आहे. शिराळ्यात शिवाजीराव नाईकांना स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवारी देण्यास उत्सुक आहे, तर नाईकांनी महायुतीत कोणत्याही पक्षाला ही जागा गेली, तर त्या पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
महायुतीचे जागावाटप होताना सांगली जिल्ह्यात त्यांच्या अन्य घटकपक्षांनाही जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे नेमक्या कोणाच्या जागा कमी होणार, याचेही कोडे सुटलेले नाही. भाजपला हक्काच्या तीन मतदार संघांसह आणखी दोन हवे आहेत.
माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विट्याचे माजी आमदार अनिल बाबर सध्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे या सर्व नेत्यांचे लक्ष आता जागावाटपाकडे लागले आहे.