जिल्हा न्यायालयाच्या बाहेर वाहतुकीला अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:26 AM2021-02-13T04:26:26+5:302021-02-13T04:26:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा न्यायालयाबाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा न्यायालयाबाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आवारातील पार्किंगच्या जागेत नियोजन करण्याची मागणी नागरिक जागृती मंचाचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्षांना निवेदन देण्यात आले.
याबाबत साखळकर म्हणाले की, न्यायालयीन कामकाजासाठी पक्षकार, नागरिक दुचाकीवरून येतात. कोरोनापूर्वी दुचाकी वाहनाचे पार्किंग न्यायालयाच्या इमारतीतील जागेत होत होते. पण आता न्यायालयीन कामकाज सुरू झाल्यापासून ही वाहने रस्त्याच्या कडेला पार्क केली जात आहेत. विजयनगरकडून हसनी आश्रमकडे जाणाऱ्या रस्त्यावरच अस्तव्यस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीला अडथळे येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील पार्किंग तत्काळ बंद करून न्यायालयीन आवारातील पार्किंगच्या जागेत दुचाकी वाहनांची व्यवस्था करावी. तसेच जिल्हा न्यायालय शेजारील नाला बंदिस्त करण्यात यावा व त्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी थांबवेल, असेही ते म्हणाले.