राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सांगलीत मानवी साखळी व रॅली उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 06:25 PM2019-01-25T18:25:05+5:302019-01-25T18:44:58+5:30
मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले. हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले. नवव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियोजन समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सांगली : मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले.
नवव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नियोजन समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपजिल्हाधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, आपला संमिश्र संस्कृती असलेला देश आहे. अशा देशात निवडणुका मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणात पार पाडणे आवश्यक आहे. लोकशाही परंपरांचे जतन करण्यासाठी, लोकशाहीवर असणारी निष्ठा दृढ करण्यासाठी राज्यघटनेने दिलेल्या मतदानाचा अधिकार पार पाडण्याची अमूल्य संधी मिळाली आहे. मतदान करून लोकशाहीचा आदर ठेवा. आपल्याबरोबर आपले कुटुंबिय, शेजारी, मित्र यांची विचारधारा नकारात्मक असेल, तर ती मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करा. त्यांना मतदान करण्यास प्रवृत्त करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येक मताचे मोल अनमोल असून आपल्या एका मतामुळे आपण राष्ट्र उभारणीचे काम करीत असतो. लोकशाहीचा निर्णय प्रत्येक जबाबदार नागरिकावर आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आवडीचे सरकार निवडून आणण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. हा हक्क मिळवण्यासाठी, विशेषतः महिलांना हा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. संघर्षातून मिळालेला हा अधिकार म्हणजे लोकशाहीला बळ देण्याची संधी आहे. त्यामुळे आगामी लोकशाही, विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावा, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात मीनाज मुल्ला म्हणाले, अनेक उपक्रमांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे. दिव्यांग मतदार नोंदणीत सांगली जिल्हा राज्यात प्रथम स्थानी तर मतदार नोंदणी कार्यक्रमात राज्यात द्वितीय स्थानी आहे. भारत निवडणूक आयोगाचे नो व्होटर टु बी लेफ्ट (कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहु नये) हे घोषवाक्य आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. प्रत्येकाने मतदान करावे.
यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिवस मतदारांसाठीची प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच, चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्त्व, प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त यांचा संदेश चित्रफीतीद्वारे दाखवण्यात आला. तसेच, व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कार्यक्रमानंतर दिव्यांगांनी मतदार जागृतीबाबत सादर केलेले पथनाट्य उपस्थितांचे आकर्षण ठरले. यावेळी विविध अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मतदार जनजागृती रॅली उत्साहात
दरम्यान राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त स्टेशन चौक सांगली येथून काढण्यात आलेली मतदार जनजागृती रॅली उत्साहात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, महानगरपालिका आयुक्त रविंद्र खेबुडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे, तहसिलदार संगमेश कोडे, प्राध्यापिका सुनिता बोर्डे-खडसे आदि उपस्थित होते.
यावेळी मतदार जनजागृतीसाठी मानवी साखळी, श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. या प्रसंगी उपस्थितांना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाची शपथ दिली. त्यानंतर एन.सी.सी., एन.एस.एस. विद्यार्थ्यांची स्टेशन चौक ते आझाद चौक मार्गे स्टेशन चौक अशी मतदार जनजागृती रॅलीची सांगता झाली. तसेच स्टेशन चौक ते पुष्कराज चौक व परत स्टेशन चौक अशी सायकल रॅलीही काढण्यात आली.
या मानवी साखळी व रॅलीमध्ये मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र, विलिंग्डन कॉलेज, श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, डॉ पतंगराव कदम महाविद्यालय, नेमगोंडा दादा पाटील नाईट कॉलेज ऑफ आर्टस ऍ़ण्ड कॉमर्स, गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, एन.सी.सी. एन.एस.एस. विद्यार्थी, प्राध्यापक यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच इतर शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.