सिंचन योजनांच्या पूर्णत्वासाठी प्रसंगी कर्ज
By admin | Published: April 22, 2016 10:57 PM2016-04-22T22:57:34+5:302016-04-23T00:59:17+5:30
गिरीश महाजन : नागजमध्ये टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन; आघाडी सरकारवरही सिंचनप्रश्नी टीका
ढालगाव : जिल्ह्यातील सर्व सिंचन योजना येत्या दोन वर्षात पूर्ण करणार असून, प्रसंगी कर्ज काढावे लागले तरी चालेल, पण शेतकऱ्यांना निश्चिपणे न्याय देऊ, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.
नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे शुक्रवारी टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत कवठेमहांकाळ कालव्यात पाणी सोडण्याचा कार्यक्रम व पाणीपूजनप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात महाजन बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
महाजन म्हणाले की, १९९५-९६ च्या काळात भाजप-सेनेची युती होती. त्यावेळीच महामंडळाची स्थापना करुन पाणी योजना मार्गी लावल्या. परंतु पुन्हा सत्ता न आल्याने पाणी योजनांची कामे अपूर्णच राहिली. मराठवाड्यात तर पशु-पक्षी पिण्याच्या पाण्याअभावी मृत्युमुखी पडत आहेत. १९७२ चा दुष्काळ हा अन्नधान्याचा होता. मात्र त्यापेक्षाही हा दुष्काळ भीषण आहे. धरणांमध्ये अडीच टक्केही पाणी उपलब्ध नाही. भविष्यात ठिबक सिंचनाशिवाय पर्याय नाही. हे आपणास करावेच लागेल, तरच पाणी सर्वांना मिळेल. अन्यथा एका विचारवंताने म्हटल्याप्रमाणे, पाण्यासाठी युद्ध होण्याची वेळ दूर असणार नाही.
दानवे म्हणाले की, याअगोदरच्या शासनाने ७० हजार कोटी खर्च केले, धरणे बांधली. पण जलसिंचन क्षेत्र शून्य टक्केही वाढले नाही. आता धरणाचे दिवस संपले आहेत. लोक आमच्या जमिनी धरणात घालवू नका म्हणतात, म्हणून आम्ही ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून निसर्गाचे पाणी नाले, नद्या, तलावांच्या माध्यमातून दुसरीकडे न जाऊ देता तिथेच जिरवले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ लागला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीही जात नाहीत. पंतप्रधान मोदी यांनी नवीन पीक योजना अंमलात आणली. ५० टक्के आणेवारीची ब्रिटिशकालीन पद्धत बंद करुन, ३३ टक्के नुकसान झाले तरी पीक विमा मिळतो व समजा पाऊस पडला नाही तरी खते, बी-बियाणे यासाठी २५ टक्के रक्कम मिळते. पूर्वी शेकडा १५ टक्के रक्कम भरावी लागत होती.
आता शेकडा खरीप पिकासाठी अडीच रुपये, रब्बीसाठी दीड रुपया व फळबागासाठी साडेचार रुपये भरावे लागतात. हा बदल घरोघरी पोहोचला पाहिजे.
खा. पाटील म्हणाले की, केळकर अहवालाअनुसार विदर्भातील मानव विकास निर्देशांकापेक्षा या भागातील शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे. त्यामुळे आगळगाव, घाटमाथा व ढालगाव योजना पूर्ण करुन तातडीने पाणी द्या.
जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ढालगावसह परिसरातील दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मात्र आगळगाव, घाटमाथा व ढालगाव भागासाठी निधीची तरतूद करुन या पाणी योजनांना गती द्यावी. बिरोबा मंदिराच्या विकासासाठी निधी द्यावा. आर. आर. पाटील आबांमुळे ढालगाव भागाचा टेंभूमध्ये समावेश झाला. मात्र आबांच्या आकस्मिक जाण्याने या भागातील कामे मंदावली होती. आता खा. संजय पाटील यांच्यामुळे कामाला गती मिळाली आहे.
कार्यक्रमास आ. गणपतराव देशमुख, आ. विलासराव जगताप, सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, राज्य उपाध्यक्षा नीता केळकर, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे-म्हैसाळकर, सभापती वैशाली पाटील, दादासाहेब कोळेकर, अनिल शिंदे, पतंग यमगर, शिवाजी चंदनशिवे, हायूम सावनूरकर, जयसिंग शेंडगे, रमेश शेंडगे, माजी आमदार शहाजी पाटील, भारत निकम, डॉ. दिलीप ठोंबरे उपस्थित होते. (वार्ताहर)
देशमुखांना दाद...
शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या अभ्यासपूर्ण व खड्या आवाजातील भाषणाला सर्वांची दाद मिळाली. सर्वच मंत्र्यांनी ते लक्षपूर्वक ऐकले.
महामंडळ रद्द करू नका!
माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले की, नागज येथील दोनशे शेतकऱ्यांना नागझरीतून पाणी सोडावे, शेतकरी योजनेची पाणीपट्टी भरण्यास तयार आहे. मात्र पाणी दिले म्हणून कृष्णा खोरे महामंडळ रद्द करु नका. लोकांनी फळबागांची लागवड करावी आणि त्यावर प्रक्रियेसाठीचे व्यवस्थापन या महामंडळाने करावे, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी स्वाभिमानी : कर्ज, अनुदान नको...
सहकारमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी पाणी मागतोय, त्याला कर्जमाफी, अनुदान नको आहे. तो स्वाभिमानाने जगणारा आहे. अपूर्ण योजना पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे. अडचणी आहेत, परंतु त्यातूनही मार्ग काढून योजना पूर्ण करु.