ऊस वाहतूक ठेकेदारांना फसविणाऱ्या मुकादमांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:41+5:302021-01-01T04:18:41+5:30
विटा : ऊसतोड मजूर देण्याचे आमिष दाखवून खानापूर व कडेगाव तालुक्यातील तीन ऊस वाहतूक ठेकेदारांना २७ लाख २५ हजार ...
विटा : ऊसतोड मजूर देण्याचे आमिष दाखवून खानापूर व कडेगाव तालुक्यातील तीन ऊस वाहतूक ठेकेदारांना २७ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन मुकादमांविरूध्द बुधवारी रात्री उशिरा विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
विजय महादेव उबाळे (रा. साळुंखे वस्ती, बामणी, ता.सांगोला, जि. सोलापूर) व कुबेर शिवाजी चव्हाण (रा. हिंगणी तामाण, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन मुकादमांची नावे आहेत. याप्रकरणी राहुल भालचंद्र शिंदे ( वय ४२, रा. वडियेरायबाग, ता. कडेगाव) व विशाल धनाजी पाटील (२३, रा. हणमंतनगर, विटा) या दोघांनी विटा पोलिसांत तक्रार दिली आहे.
वडियेरायबाग येथील राहुल शिंदे व त्यांचे विटा येथील मेहुणे प्रवीण कदम या दोघांच्या दोन ट्रॅक्टरव्दारे कुंडल येथील क्रांती कारखान्याला ऊस वाहतूक केली जाते. यासाठी शिंदे यांनी पाचेगाव (ता. सांगोला) येथील अमिताभ सुनील कांबळे यांच्या ओळखीने संशयित मुकादम विजय उबाळे याच्याशी संपर्क साधून दोन ट्रॅक्टरसाठी १४ कोयते म्हणजे २८ मजूर पाहिजे असल्याचे सांगितले. शिंदे यांनी प्रत्येक कोयत्यास ७० हजार प्रमाणे १४ कोयत्यांचे ९ लाख ८० हजार रुपये व मजूर वाहतुकीचे भाडे २० हजार असे १० लाख रुपये मुकादम उबाळे यास नोटरी करून दिले, परंतु उबाळे याने त्यांची फसवणूक केली.
विटा येथील ऊस वाहतूक ठेकेदार विशाल पाटील यांनीही श्री दत्त इंडिया प्रा. लि., कारखान्याशी ऊस पुरविण्याचा करार केला होता. त्यांना २० कोयते म्हणजे ४० ऊसतोड मजुरांसाठी मुकादम कुबेर शिवाजी चव्हाण यांच्याशी नोटरी करून त्यास ऑक्टोबर २०२० मध्ये ९ लाख २५ हजार रुपये दिले. तसेच शिवणी (ता. कडेगाव) येथील ऊसतोड वाहतूक ठेकेदार रवींद्र तुकाराम माने यांच्याकडूनही संशयित चव्हाण याने ८ लाख रुपये नोटरी करून घेतले.
परंतु या दोघांनाही चव्हाण याने ऊसतोड मजूर पुरविले नाहीत. त्यामुळे या दोघांचीही फसवणूक झाल्याने त्यांनीही कुबेर चव्हाण याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.