बोरगावमध्ये गावगुंडांकडून बाहेरगावच्या मुलींची छेडछाड
By admin | Published: May 6, 2016 12:35 AM2016-05-06T00:35:23+5:302016-05-06T01:09:54+5:30
परिसरात निषेध : मुलींना शिक्षणास न पाठविण्याचा ग्रामसभेचा ठराव
इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील गावगुंडांच्या टवाळखोरीला कंटाळून, तेथे शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना शिक्षणासाठी न पाठविण्याचा निर्णय परिसरातील पालकांनी घेतला आहे. मसुचीवाडी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावून, एकही मुलगी शिक्षणासाठी बोरगाव येथे पाठवू नये, असा ठराव केला आहे. मुलींची छेड काढल्याप्रकरणी काही पालकांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मसुचीवाडी येथून दररोज किमान ५0 ते ६0 विद्यार्थी- विद्यार्थिनी शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. तसेच परिसरातील फार्णेवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी, बनेवाडी, जुनेखेड, नवेखेड येथून अंदाजे ४00 ते ५00 मुले—मुली बोरगाव येथे शिक्षणासाठी येतात. काही विद्यार्थिनी एसटी बस, खासगी वाहनांनी, तर काही पायी बोरगाव येथे शिक्षणासाठी येत असतात. गावातील काही टवाळखोर गावगुंड शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत बोरगावच्या बसस्थानक परिसरात टोळके करुन उभे असतात. त्यांच्याकडून मुलींना अश्लील बोलणे, हावभाव करणे, लगट करणे, फोन नंबर मागणे आदी प्रकार घडत आहेत.
या त्रासाला कंटाळून मुलींनी पालकांकडे तक्रार केली. पालकांनी राजकीय नेतेमंडळी व शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. मात्र त्यांनी याप्रश्नी कोणतीही दखल घेतली नाही. यामुळेच मसुचीवाडी येथील ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा बोलावून, गावातून एकही मुलगी बोरगावात शिक्षणासाठी पाठवू नये, असा ठराव मंजूर करण्यात आला. यापुढे होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा आदी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा ठराव करण्यात आला.
सध्या उन्हाळी सुट्टी आहे. आगामी २०१६—२०१७ या शैक्षणिक वर्षासाठी बोरगाव येथील शाळा, महाविद्यालयांतील दाखले काढून इतर ठिकाणी मुलींना प्रवेश घेण्यासाठी मसुचीवाडीतील ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मसुचीवाडी येथील विशेष ग्रामसभेस सरपंच सुहास कदम, उपसरपंच संभाजी कदम, संजय कदम, हौसेराव नांगरे—पाटील, हणमंत गिरी, वसंत कदम, शांताराम
कदम, सुरेश कदम, राजाराम कदम, युवराज कदम, विक्रम कुंभार, सचिन माने, अमोल कदम, अमर कदम, गणेश कदम, डी. जी. कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)