पदाधिकाऱ्यांचे राजीनामा नाट्य रंगणार
By admin | Published: January 5, 2016 12:55 AM2016-01-05T00:55:38+5:302016-01-05T00:55:38+5:30
जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे ‘नॉट रिचेबल’ : पदाधिकारी बदलाची प्रक्रिया रखडणार
सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षांसह चार सभापतींना राजीनामा देण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी देऊनही, उपाध्यक्षांसह दोघे सभापती वगळता इतरांनी राजीनामा देण्यास चालढकल सुरू केल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
कृषी व पशुसंवर्धन सभापती मनीषा पाटील यांनी राजीनाम्यास नकार दिल्याने, त्यांचे पती तानाजी पाटील यांची नेत्यांकडून मनधरणी सुरू आहे. तसेच सभापती उज्ज्वला लांडगे यांनीही सोमवारी राजीनामा सादर केला नसल्याने, पदाधिकारी बदलाची प्रक्रिया रखडणार आहे. दरम्यान, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, महिला व बालकल्याण सभापती पपाली कचरे यांनी शनिवारीच अध्यक्षा होर्तीकर यांच्याकडे राजीनमा सुपूर्द केला आहे.
अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य समिती सभापती गजानन कोठावळे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे, समाजकल्याण समिती सभापती उज्ज्वला लांडगे या पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला असल्यामुळे, राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजीनामा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लिंबाजी पाटील, कोठावळे आणि कचरे यांनी शनिवारी राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे सादर केला आहे. सभापती उज्ज्वला लांडगे सोमवारी राजीनामा देणार होत्या. मात्र, त्यांनीही नेत्यांना हुलकावणी दिली.
या पार्श्वभूमीवर मनीषा पाटील यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळे नेत्यांची पंचाईत झाल्याने, अखेर त्यांचे पती तानाजी पाटील यांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पाटील यांनी पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदाची संधी देण्याचा शब्द दिला होता. नेत्यांनी हा शब्द पाळावा, असे तानाजी पाटील यांनी सांगितले होते. सोमवारी सायंकाळीही याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे आणि तानाजी पाटील यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त होते. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही. याबाबत जिल्हाध्यक्ष शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते ‘नॉट रिचेबल’ होते. (प्रतिनिधी)
पदाधिकारी निवडी रखडणार
पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिल्यानंतर पदाधिकारी निवडीत संधी मिळण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांमार्फत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. सभापतींनी राजीनामा सादर केला नसल्याने इच्छुकांत अस्वस्थता आहे.