वर्गातच चालते कार्यालय आणि कार्यालयातच भरतो वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:38 AM2021-02-26T04:38:49+5:302021-02-26T04:38:49+5:30
सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना अनेक मूलभूत गैरसोयींना तोंड देत विद्यार्थी घडवावे लागत आहेत. स्वतंत्र कार्यालय आणि स्टाफरूम ...
सांगली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना अनेक मूलभूत गैरसोयींना तोंड देत विद्यार्थी घडवावे लागत आहेत. स्वतंत्र कार्यालय आणि स्टाफरूम नसणे ही त्यापैकीच एक अडचण. विशेषत: मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय नसणे ही सरसकट भेडसावणारी समस्या आहे.
माध्यमिक शाळांना कार्यालय, स्टाफरूम, शिपाई, स्वतंत्र प्रयोगशाळा आदी सोयी असल्या तरी प्राथमिक शाळांसाठी जणू त्या चैनीच्याच सुविधा ठरल्या आहेत. जिल्ह्यातील मोठ्या शाळांत मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय आहे. पश्चिम भागातील काही शाळांमध्ये पटसंख्या कमी झाल्याने वर्ग मोकळे पडले, तेथेही मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करता आले, पण अन्यत्र मात्र एखाद्या वर्गातच कार्यालयाचे कामकाज चालवावे लागते.
प्रामुख्याने उर्दू शाळा, कन्नड शाळा, एकशिक्षकी व द्विशिक्षकी शाळा, तसेच वस्तीशाळांमध्ये ही समस्या आहे. विद्यार्थ्यांनाच पुरेशा वर्गखोल्या मिळेपर्यंत मारामार, तेथे स्वतंत्र कार्यालय किंवा स्टाफरूमसाठी आग्रह कसा धरायचा, अशी शिक्षकांची मानसिकता निर्माण झाली आहे. केंद्रस्तरीय किंवा जिल्हास्तरीय बैठकांत शाळेसाठी शिक्षक, वर्गखोल्या व इतर सुविधांसाठी पाठपुरावा होतो, पण मुख्याध्यापक कार्यालय किंवा स्टाफरूमचा विचारही मनात येत नाही.
चौकट
विद्यार्थ्यांसमोरच चालते कार्यालय
केंद्रशाळांमध्ये स्वतंत्र खोलीत कार्यालये आहेत, अन्य शाळांत मात्र एखाद्या वर्गात बसूनच कार्यालयीन कामकाज चालवावे लागते. समोर विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू असतानाच मुख्याध्यापकांना शालेय व्यवस्थापनाचा गोंधळही सांभाळावा लागतो. दुपारचा डबा खाण्यासाठीही वर्गातच एखाद्या कोपऱ्यात बसावे लागते. पेपर तपासणी, गुणपत्रिका तयार करणे, नोटिसा बनविणे, पोषण आहाराचा अहवाल तयार करणे ही कामे वर्गात विद्यार्थ्यांसमोरच चालतात. यानिमित्ताने जणू विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षणाचे धडेही मिळतात.
चौकट
जतमध्ये सर्वाधिक शाळा
जत तालुक्यात अशा शाळांची संख्या सर्वाधिक आहे. छोट्या शाळा असल्याने तेथे मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालयेच नाहीत. कन्नड शाळांची संख्याही जास्त असल्याने वर्गखोल्यांची मारामार आहे. काही शाळांत तर व्हरांड्यातच एका कोपऱ्यात टेबल-खुर्ची टाकून कार्यालयीन कामकाज करावे लागते. स्टाफरूमची तर कल्पनाच करवत नाही.
कोट
सध्याच्या शाळा इमारतीत मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालये नाहीत. एखादी खोली रिकामी असेल तर तेथेच कार्यालयीन कामकाज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १४३ शाळा नव्याने १४३ मॉडेल स्कूलमध्ये रूपांतरित करत आहोत. त्यांच्या आराखड्यात स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय, स्टाफरूम आदी सुविधांचा प्राधान्याने विचार केला आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड सुविधा तेथे देत आहोत.
- प्राजक्ता कोरे, अध्यक्षा, जिल्हा परिषद
पाॅईंटर्स
जिल्ह्यातील एकूण शाळा - १६८८
मुख्याध्यापक कक्ष नसलेल्या शाळा - ९५०
स्टाफरूम नसलेल्या शाळा - १६२०
या शाळांतील विद्यार्थी - ११७१४५