Sangli: मिरजेत अतिक्रमण हटवताना अधिकाऱ्यास मारहाण, संशयित झाला पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:11 IST2025-04-05T13:10:54+5:302025-04-05T13:11:31+5:30

कारवाईस विरोध : अतिक्रमण विभागप्रमुखांची कॉलर धरली

Officer beaten up while removing encroachments in Miraj, action was underway without police protection | Sangli: मिरजेत अतिक्रमण हटवताना अधिकाऱ्यास मारहाण, संशयित झाला पसार

Sangli: मिरजेत अतिक्रमण हटवताना अधिकाऱ्यास मारहाण, संशयित झाला पसार

मिरज : मिरजेत दर्गा परिसरात अतिक्रमण काढताना महापालिका अतिक्रमण विभागप्रमुख दिलीप घोरपडे यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. याबाबत घोरपडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. महापालिका अतिक्रमण हटाव पथक शुक्रवारी दुपारी मीरासाहेब दर्गा कॉर्नर येथे भिंतीलगत बेकायदा खोक्यांचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कारवाईस विरोध करण्यासाठी जमाव जमला. जमावातील एकाने दिलीप घोरपडे यांची कॉलर धरून धक्काबुक्की व मारहाण केली.

पोलिस बंदोबस्त न घेता अतिक्रमण विभागप्रमुख दिलीप घोरपडे जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत गेले होते. त्यांनी सूचना देऊनही खोकी काढली नसल्याने जेसीबीने खोकी काढण्यास सुरुवात केली. यावेळी काही तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला. यावेळी जमवातील एकाने दिलीप घोरपडे यांच्या शर्टाला धरून ओढण्याचा प्रयत्न करीत मारहाण केली. यावेळी जोरदार वादावादी झाली. या प्रकारामुळे अतिक्रमण हटाव कारवाई थांबवून घोरपडे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध तक्रार दिली आहे.

मिरजेत अतिक्रमणे हटवताना यापूर्वीही महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने दर्ग्याजवळची अतिक्रमणे काढण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केलेली नव्हती. अतिक्रमणे काढताना पोलिस बंदोबस्त घेण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्याचे शहर पोलिस पोलिस निरीक्षक रामचंद्र रासकर यांनी सांगितले.

संशयिताचे मारहाण करून पलायन

मिरज शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. प्रमुख रस्त्यालगत खोकी टाकून त्यात मटका व अवैध व्यवसाय सुरू असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने महापालिका आयुक्तांकडे केली होती. यामुळे शुक्रवारी महापालिकेचे पथक खोकी अतिक्रमणे हटवण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला. मटका व्यवसाय सुरू असलेले खोके हटविण्यास गेल्यानंतर गौस नावाच्या मटका एजंटाने घोरपडे यांना मारहाण करून तेथून पलायन केल्याची चर्चा होती.

फुटपाथ, रस्ते अतिक्रमणाने व्यापले

मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरात मुख्य रस्ते व फुटपाथवर अतिक्रमणे झाली आहेत. मार्केट परिसर अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. रस्त्यावर, चौकात खोकी, हातगाड्यांवर उद्योग सुरू असून, प्रमुख रस्त्यालगत खोक्यांची अतिक्रमणे आहेत. व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानांपुढे फुटपाथ व रस्ते व्यापले असून, पक्की बांधकामे करून शेड मारल्या आहेत. अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. ही अतिक्रमणे हटवण्यासाठी गेल्यावर हल्ले होत असल्याने अतिक्रमण हटाव कारवाई गुंडाळण्यात येते.

Web Title: Officer beaten up while removing encroachments in Miraj, action was underway without police protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.