प्रलंबित कामावरून अधिकारी धारेवर
By admin | Published: June 28, 2017 11:07 PM2017-06-28T23:07:27+5:302017-06-28T23:07:27+5:30
महापालिका स्थायी समिती सभा : अंदाजपत्रकात तरतूद नसल्याने दहा कोटींची कामे रखडली
लोकमत न्यूज नेटवर्क -सांगली : महापालिका प्रशासनातील विभागांत समन्वय नसल्याने ठेकेदारांची १० कोटीची थकीत बिले अडकल्याचे स्थायी समितीच्या सभेत उघडकीस आले. संतप्त सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत, तरतूद करायला भाग पाडले. महापालिका चौक ते एसटी स्टँड रोड, शिवाजी पुतळ्यापर्यंतच्या १ कोटी ६७ लाखाच्या हॉटमिक्स रस्ते कामाला अखेर मंजुरी दिली. दरम्यान, भटकी कुत्री, डुकरे यावरुनही वादळी चर्चा झाली. शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण वाढले आहे, याबाबत आरोग्य विभागावर सदस्यांनी ताशेरे ओढले.
शहरात पावसाळा सुरु झाला आहे. रस्त्यावरचे खड्डे अद्याप अनेक ठिकाणी तसेच आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी सदस्यांकडे येत आहेत. याबाबत सभापती संगीता हारगे यांनी, दोन दिवसात खड्डे मुजवा, ठेकेदार कोण आहे, काम कोणाकडे आहे, याच्याशी आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. मुजविलेल्या खड्ड्यांची तपासणी करा. पॅचवर्क तपासायला अधिकारी नाहीत. मुरुम कुठे टाकला याची माहिती नाही. प्रशासनाने ताळमेळ ठेवावा, असे आदेश दिले.
शिवराज बोळाज यांनी, शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण वाढत चालल्याने आरोग्य धोक्यात येत असल्याचा प्रश्न मांडला. कचरा उठावाचे नियोजन नाही. शहरात अनेक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या आढळून येत आहेत. त्यामुळे गटारी तुंबण्याचे प्रमाण वाढले आहे. मारुती चौकात पावसाचे साचलेले पाणी निचरा करताना, गटारीत प्लॅस्टिक पिशव्यांचे प्रमाण जास्त आढळून आले आहे. यावर नियंत्रण आणण्याचे काम आरोग्य विभागाचे आहे. तात्काळ हे प्रमाण रोखा व कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली. अतहर नायकवडी यांनी, शिक्षण मंडळाकडील शिक्षकांना पगार दिला जातो, त्या प्रमाणात काम समाधानकारक नाही. गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. यातच खासगी शाळा, इंग्रजी शाळा वाढत आहेत. यात टिकण्यासाठी दर्जा सुधारला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवराज बोळाज यांनी, बालवाड्या, अंगणवाड्या सक्षम केल्या तरच शाळा सुधारतील, असे स्पष्ट केले. निर्मला जगदाळे यांनी रोस्टरचा मुद्दा उपस्थित केला. प्रतिनियुक्तीचे अधिकारी महापालिकेत येतात, महापालिकेतील अधिकाऱ्यांवर जादा कामाचा भार टाकला जातो. प्रशासनाने रोस्टर पूर्ण करुन महापालिकेतील अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
नाल्यावर : अपार्टमेंट
वानलेसवाडी येथील नैसर्गिक नाल्यावर एका बिल्डरने महापालिकेची फसवणूक करुन अपार्टमेंट उभारले आहे. याबद्दल सदस्या प्रियांका बंडगर यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमारच केला. हा नाला गेला, तर वानलेसवाडी पाण्यात जाईल. नगररचना विभागाने याआधीच्या बैठकीत अहवाल देतो असे सांगितले होते. प्रत्यक्षात आजपर्यंत अहवालच दिला नाही. अहवाल दिला नाही, तर वानलेसवाडीचे लोक स्थायीत घुसवू, असा इशाराही दिला.
भटकी कुत्री पकडण्यासाठी नव्हे, सोडण्यासाठी ठेका...
मनगू आबा सरगर यांनी, भटकी, कुत्री, डुकरे याविषयी प्रश्न उपस्थित केला. शहरात अनेक ठिकाणी भटकी कुत्री, डुकरे वाढली आहेत, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन काय करते? असा सवाल त्यांनी केला. मला तर वाटते, भटकी कुत्री पकडण्यासाठी नाही, तर सोडण्यासाठीच ठेका दिला जात असेल, असा टोला त्यांनी मारला.
खात्यावर पैसेच शिल्लक नसल्याचे उघडकीस
पैसे नसल्याच्या कारणाबद्दल सदस्यांचा संताप
ठेकेदारांना कामाची वर्क आॅर्डर दिल्यानंतर प्रशासन पैसे नसल्याचे सांगत आहे. याबाबत दिलीप पाटील, संतोष पाटील, निर्मला जगदाळे, शिवराज बोळाज, प्रियांका बंडगर, बसवेश्वर सातपुते यांनी टीकेची झोड उठविली. अखेर उपायुक्त सुनील पवार यांनी याबाबतची तरतूद केली जाईल, असे सांगितले.