महापालिकेची अनोखी संकल्पना, साकारले पहिले 'आठवण उद्यान'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:42 PM2022-01-31T18:42:13+5:302022-01-31T18:42:58+5:30
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून दोन हजार वृक्षांचे रोपण करीत पर्यावरणाचा संदेश दिला.
सांगली : माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेने मिरज रस्त्यावरील खुल्या भूखंडावर पहिले 'आठवण उद्यान' उभारणीचे काम हाती घेतले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून या उ्दयानात दोन हजार वृक्षांचे रोपण करीत पर्यावरणाचा संदेश दिला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते आज, सोमवारी वृक्षारोपणाद्वारे या नव्या उपक्रमाला सुरूवात झाली.
महापालिकेने माझी वसुंधरा अंतर्गत वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यातच एक भाग म्हणून आयुक्त कापडणीस यांच्या संकल्पनेतून सांगली मिरज रोडवरील वसंतबागमधील दोन एकर जागेवर एक आठवण उद्यान साकारण्यात येत आहे. या उपक्रमात महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. स्व: खर्चातून दोन हजार झाडे लावण्यात आली.
या उपक्रमाची सुरवात आयुक्तांनी वृक्षारोपण करून केली. ते म्हणाले की, महापालिका क्षेत्र हरित व्हावे, वसुंधरा संवर्धन व्हावे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या उद्यानात वृक्ष लावणारे कर्मचारी अधिकारी आपल्या महापालिका सेवेच्या आठवणी वृक्षाबरोबर कायम ठेवणार आहेत. एक हरित आठवण म्हणून उद्यानाला लौकिक प्राप्त होईल, असे सांगितले.
यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, एस. एस. खरात, नितीन शिंदे, अशोक कुंभार, मुख्य लेखाअधिकारी सुशीलकुमार केंबळे, आस्थापना अधिकारी अनिल चव्हाण, पाणी पुरवठा अभियंता सुनील पाटील, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, नगर अभियंता आप्पा अलकुडे, जलनिस्सारण अभियंता तेजस शहा, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, कमलाकर कुलकर्णी उपस्थित होते.
काय आहे 'आठवण उद्यान'
महापालिकेच्या सेवेत सध्या दोन हजार अधिकारी व कर्मचारी आहेत. पालिकेत बजाविलेल्या सेवेची आठवण रहावी, यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा संकल्प करण्यात आला. त्यातून मिरज रोडवरील पालिकेच्या दोन एकर जागेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून एकेक झाड लावत उद्यान साकारले आहे.