काँक्रिट रस्त्याच्या कामावरून अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:36 AM2021-06-16T04:36:32+5:302021-06-16T04:36:32+5:30
ओळी : शहरातील राममंदिर ते सिव्हिल रस्त्याच्या कामाची स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विनायक सिंहासने यांनी पाहणी केली. लोकमत न्यूज ...
ओळी :
शहरातील राममंदिर ते सिव्हिल रस्त्याच्या कामाची स्थायी सभापती पांडुरंग कोरे, विनायक सिंहासने यांनी पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील राम मंदिर चौक ते सिव्हिल हाॅस्पिटल चौक या ट्रिमिक्स काँक्रिट रस्त्याच्या कामावरून स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी शहर अभियंत्यांना धारेवर धरले. या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करीत, ठेकेदाराकडून रस्ता तात्काळ दुरुस्त करून घ्यावा, त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी नगरसेवक गजानन मगदूम, सविता मदने, सुजित राऊत उपस्थित होते. शहरातील राम मंदिर ते सिव्हिल चौकपर्यंतचा रस्ता ट्रिमिक्स पध्दतीने तयार करण्यात आला आहे. यासाठी तब्बल १ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी हा रस्ता वाहतुकीस खुला केला. त्याच्या उद्घाटनावरूनही वादविवाद झाला होता. सोमवारी सभापती कोरे, गटनेते सिंहासने यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी रस्त्याची पाहणी केली. रस्त्यावर पडलेल्या भेगा पाहून त्यांनी शहर अभियंता संजय देसाई यांना धारेवर धरले. हे एअर क्रॅक असल्याचे उत्तर देसाई यांनी दिले. पण त्यांच उत्तराने नगरसेवकांचे समाधान झाले नाही.
रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. गटार, फूटपाथचे काम अपूर्ण आहे. दुभाजकामुळे रस्ता अरुंद बनला आहे. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. ठेकेदाराला पाठीशी घालण्याचाच प्रकार सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असताना प्रशासन झोपा काढत होते काय? असा सवाल सिंहासने यांनी केला.