रेल्वेतून प्रवाशांसोबत आता अधिकारीही करणार प्रवास, गैरसोयी जाणण्यासाठी उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:21 PM2024-06-17T13:21:38+5:302024-06-17T13:22:09+5:30
प्रवाशांसोबत साधणार संवाद
सांगली : रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा वाईट अनुभव येतात. स्वच्छतागृहात पाणी नसते. पंखे, दिवे बंद असतात. तृतीयपंथीयांचा त्रास होतो. डब्यांमध्ये अस्वच्छता असते, तसेच वातानुकूलित यंत्रणाही बंद असते. याविषयी तक्रार केल्यानंतर तत्काळ निराकरण होतेच असे नाही. प्रवाशांचा हा त्रास जाणून घेण्यासाठी स्वत: अधिकारीच आता रेल्वेतून प्रवास करणार आहेत. या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी झाली. पुण्यातून विविध मार्गांवर निघणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अधिकाऱ्यांनी प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला.
पुणे विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सहायक विभागीय विद्युत अभियंता दीपक भाटी यांनी पुणे-जम्मू तावी झेलम एक्स्प्रेसच्या वेळेत धावण्यावर लक्ष ठेवले. पुणे ते दौंडदरम्यान प्रवासाचे निरीक्षण केले. त्याचवेळी एक्स्प्रेससमधील प्रवाशांसोबतही संवाद साधला. सेवेत सुधारणांसाठी त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. याचा अहवाल तयार करून विश्लेषण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
झेलमच्या वातानुकूलित डब्यातील तापमान प्रवाशांच्या गरजेइतके असल्याची खातरजमा करण्यात आली. डब्यातील तापमान प्रवाशांच्या सोयीनुसार ठेवण्याची सूचना बोगीतील तंत्रज्ञाला देण्यात आली. प्रवाशांनी मागणी केल्यास थर्मोस्टॅटवर त्यांना तापमान दाखविण्याची सूचनाही अधिकाऱ्यांनी केली.
प्रवाशांच्या सुविधा तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची पथके तयार केली जाणार आहेत. ते धावत्या गाडीत प्रवाशांशी थेट संवाद साधतील. त्यांच्या सूचनांनुसार शक्य तितक्या सुधारणा करण्यात येणार आहेत. पुणे विभागातील विविध मार्गांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. - राम पाल बरपग्गा, जनसंपर्क अधिकारी