सांगली जिल्हा बँकेचे अधिकारी म्हणतात, सूतगिरणीची विक्री बेकायदेशीरच; कायदेशीर अभिप्राय मागवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 01:14 PM2023-01-21T13:14:16+5:302023-01-21T13:14:35+5:30
याप्रकरणी बँक व संचालक अडचणीत येण्याची शक्यता असल्याने विक्री व्यवहार रद्द करून सूतगिरणी पुन्हा ताब्यात घेता येते का, याची चाचपणी सुरू
सांगली : आटपाडीतील बाबासाहेब देशमुख सहकारी सूतगिरणी खासगी कंपनीला कवडीमोल दराने विकण्यात आल्याने वस्त्रोद्योग मंडळाने जिल्हा बँकेला खडसावले आहे. याबाबत बँकेच्या संचालकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता ही विक्री बेकायदेशीर असल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत मान्य केले आहे. याप्रकरणी बँक व संचालक अडचणीत येण्याची शक्यता असल्याने विक्री व्यवहार रद्द करून सूतगिरणी पुन्हा ताब्यात घेता येते का, याची चाचपणी सुरू झाली आहे. यासाठी तज्ज्ञ वकिलांकडून कायदेशीर अभिप्राय मागवण्यात येणार आहे.
देशमुख सूतगिरणीकडील १४ कोटींच्या थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने सूतगिरणीच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा लिलाव केला. लिलावावेळी वाजवी किंमत (अपसेट प्राइस) ४० कोटी रुपये ठेवण्यात आली होती. प्रत्यक्षात सूतगिरणी अवघ्या १४ कोटी रुपयांना बाबासाहेब देशमुख इंडस्ट्रीज या खासगी कंपनीला विकण्यात आली. विक्री करताना बँकेने सूतगिरणीवरील अन्य २५ कोटींची देणी कंपनीने फेडावीत यासह अन्य अटी, शर्ती घातल्या होत्या.
जिल्हा बँकेने स्वत:चे कर्ज फेडून घेत अन्य देण्यांची जबाबदारी संबंधित कंपनीवर टाकून हात रिकामे केले; पण यामुळे सूतगिरणीवरील अन्य देणी कोण फेडणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या व्यवहाराची माहिती मिळताच वस्त्रोद्योग मंडळाने बँकेच्या आजी, माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून कानउघाडणी केली. याप्रकरणी बँकेवर वसुलीची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
सूतगिरणीची विक्री मागील संचालक मंडळाच्या काळात झाली आहे. त्यामुळे काही विद्यमान संचालकांना याची माहितीच नव्हती. याप्रकरणी संबंधित संचालकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता ही विक्री बेकायदेशीरच असल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत मान्य केले. वस्त्रोद्योग मंडळांच्या दणक्यानंतर व संचालकांच्या नाराजीनंतर संबंधित कंपनीने तातडीने शासकीय व अन्य देणी न दिल्यास हा विक्री व्यवहार रद्द करण्याचा विचार जिल्हा बँक करत आहे. सूतगिरणीच्या मालमत्तेचा पुन्हा ताबा घेऊन फेरलिलाव काढता येतो का, याबाबत कायदेशीर अभिप्राय घेत असल्याचे संचालकांनी सांगितले.
४० नव्हे १४ कोटींनाच विक्री
सूतगिरणीचा विक्री व्यवहार १४ कोटींचाच असून, या रकमेचे मुद्रांक शुल्क भरले आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या ही सूतगिरणी १४ कोटींनाच विकली गेल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.