शासकीय अधिकाऱ्यांची माणुसकी; वर्गणी काढून ऊसतोड मजुरांना दिली दिवाळी भेट
By अशोक डोंबाळे | Published: November 11, 2023 05:40 PM2023-11-11T17:40:42+5:302023-11-11T17:40:57+5:30
सांगली : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी ऊसतोड कामगारांना उसाच्या फडामध्ये जाऊन ...
सांगली : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी ऊसतोड कामगारांना उसाच्या फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे वाटप केले. वीस महिलांना साडी-चोळी आणि फराळाचे वाटप केले. हे सर्व शासनाच्या पैशांतून नव्हे तर महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून खर्च केला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आल्याची कल्पना उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांना मिळाली. त्यानंतर आपल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी ऊसतोड मजुरांना साडीचोळी आणि फराळ वाटप करून त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी सायंकाळी ऊसतोड मजूर झोपड्यावर येताच तेथे जाऊन तेथील सर्व २० महिलांना साडीचोळी आणि फराळाचे वाटप केले. अधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे कसबे डिग्रजसह ऊसतोड मजुरांनी कौतुक केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव, बालविकास प्रकल्प अधिकारी सरिता उबाळे, शकुंतला निकाम, सुगरण राठोड, फीजा मकानदार, कसबे डिग्रज येथील जयवंत नलवडे, रियाज तांबोळी, सुनीता निकम, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.
दिवाळीचे औचित्य साधून कसबे डिग्रज येथे ऊसतोड महिलांना साडीचोळीसह फराळाचे वाटप करून आम्ही त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी केली. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता आणि तो पाहूनच समाधान वाटले. सर्वसामान्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य समजून माणुसकीच्या नात्याने आम्ही सर्वांनी मदत केली. -संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.