जुन्या प्रशासकांच्या चौकशीचे आदेश नाहीत
By admin | Published: December 5, 2015 12:37 AM2015-12-05T00:37:06+5:302015-12-05T00:43:05+5:30
सहनिबंधकांची माहिती : वसंतदादा बँक चौकशी प्रकरण
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेचे माजी प्रशासक महेश कदम यांच्या चौकशीबाबत कोणतेही आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, ठेवीदारांच्या एका संघटनेने असा आदेश झाल्याचा दावा केला आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेवर २६ जून २00८ रोजी रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर ७ जानेवारी २00९ रोजी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीबरोबरच शहरातील सहकारी पतसंस्थांच्या मोठ्या प्रमाणावर ठेवी अडकल्या आहेत. या बँकेवर प्रशासक म्हणून तीन वर्षापूर्वी महेश कदम यांची नेमणूक झाली होती. त्यांच्या काळात झालेल्या मालमत्तांच्या विक्रीप्रकरणी ठेवीदार संघटनेने सहकार विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर नोव्हेंबर महिन्यात सहकार विभागाने सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवून तक्रारीबाबत शहानिशा करून अहवाल पाठविले होते.
एकीकडे तक्रारी सुरू असतानाच महेश कदम यांची गुरुवारी बदली करण्यात आली. काही अधिकाऱ्यांनी ही नियमितची बदली असल्याचे सांगितले. याबाबत जिल्हा उपनिबंधक व सध्याचे प्रशासक प्रकाश अष्टेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कदम यांच्या बदलीच्या आदेशाबरोबरच त्याठिकाणी अवसायक म्हणून माझी नियुक्ती केल्याचाही आदेश होता. त्याशिवाय त्यांच्या कारभाराची चौकशी करण्याबाबत सहकार विभागाने कोणताही पत्रव्यवहार केला नाही. अद्याप आमच्याकडे असे कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे बदलीचा आणि चौकशीचा तूर्त काहीही संबंध नाही.
वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील १७0 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रश्नी सध्या चौकशी सुरू आहे. मात्र, याठिकाणी दुसऱ्या कोणत्याही चौकशीचे आदेश अद्याप जिल्हा उपनिबंधकांना प्राप्त झालेले नाहीत. १८ नोव्हेंबरच्या सहकार विभागाच्या पत्राबाबतही येथील अधिकारी अनभिज्ञ आहेत.(प्रतिनिधी)
असे पत्रच नाही...
कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक दराडे यांनी सांगितले की, कदम यांची सातारा येथे बदली झाल्यामुळे त्यांच्याजागी नवे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्ती व बदलीच्या आदेशाशिवाय कोणतेही पत्र सहकार विभागाला प्राप्त झालेले नाही. कदम यांच्या चौकशीचे आदेश सहकार आयुक्तांनी दिल्याचीही आपल्याला कल्पना नाही. चौकशीच्या कारणास्तव त्यांची बदली झाल्याचे वृत्त चुकीचे आहे.