जुने पंधरा चेहरे पुन्हा मैदानात
By admin | Published: January 20, 2017 11:06 PM2017-01-20T23:06:35+5:302017-01-20T23:06:35+5:30
जिल्हा परिषद : माजी अध्यक्षांसह उपाध्यक्षांचा समावेश; विविध पक्षांकडे उमेदवारीची मागणी
सांगली : जिल्हा परिषदेच्या सभागृहात पूर्वी काम केलेल्या सदस्यांचे मतदारसंघ पुन्हा खुले झाल्यामुळे, यंदाच्या निवडणूक मैदानात उतरण्याची त्यांना संधी मिळाली आहे. त्यात माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह पंधराजणांचा समावेश आहे. पाच जणांनी पक्षांतर केल्यामुळे ते नवीन पक्षाचिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.
जिल्हा परिषद मतदार संघांत आरक्षण पडल्यामुळे २००७ आणि २०१२ च्या निवडणुकीपासून अनेकांना दूर राहावे लागले होते.
देवराष्टे्र गटातून १९९८ मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर मालन मोहिते विजयी झाल्या होत्या. पुढे १९९९ ते २००२ या कालावधित त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाही झाल्या. पुढे पंधरा वर्षे हा मतदारसंघ विविध घटकांसाठी आरक्षित राहिला. यामुळे त्यांना निवडणूक मैदानात उतरता आले नाही. परंतु, आता त्यांचा मतदारसंघ पुन्हा महिलांसाठी खुला झाला आहे. त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
काँग्रेसच्या चिन्हावर भोसे गटातून २००७ मध्ये विजयी झालेल्या कांचन पाटील यांनाही २००७ ते २००९ या कालावधित अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. २०१२ च्या आरक्षण सोडतीमध्ये त्यांचा मतदारसंघ दुसऱ्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांची संधी हुकली होती. आता त्यांचा मतदारसंघ पुन्हा महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे त्या इच्छुक आहेत. मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची, हे निश्चित झाले नाही. २००७ च्या निवडणुकीत सत्यजित देशमुख जिल्हा परिषदेत आले होते. त्यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. यांचा कोकरूड मतदारसंघ यावेळी खुला झाल्यामुळे ते मैदानात उतरणार आहेत. पुढची अडीच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास अध्यक्षपदाचे ते प्रबळ दावेदार समजले जात आहेत.
बोरगाव गटाचे २००७ मध्ये नेतृत्व केलेले जितेंद्र पाटील यांचा मतदारसंघ पुन्हा खुला झाला आहे. त्यामुळे तेही इच्छुक आहेत. त्यांचाही अध्यक्षपदावर दावा आहे. राष्ट्रवादीच्या चिन्हावर विसापूर गटातून २००७ मध्ये विजयी झालेले सुनील पाटील यांचा मतदारसंघ २०१२ मध्ये आरक्षित झाला.
यामुळे त्यांना पाच वर्षे थांबावे लागले. सध्या ते काँग्रेस अथवा भाजपच्या चिन्हावर मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
चिकुर्डे (ता. वाळवा) गटातील अभिजित पाटील २००७ मध्ये काँग्रेसकडून विजयी झाले होते. आरक्षणामुळे त्यांनाही पाच वर्षांची सुटी मिळाली होती. त्यांचा मतदारसंघ पुन्हा खुला झाला असून ते तयारीत व्यस्त आहेत. यावेळी ते शिवसेनेकडून निवडणूक लढविणार आहेत.
हुतात्मा आघाडीच्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी २००७ ते २०१२ या कालावधित वाळवा मतदारसंघातून सदस्या होत्या. त्यांचा मतदारसंघ २०१२ मध्ये खुला झाल्यामुळे, येथून गौरव नायकवडी मैदानात उतरले होते. आता हा मतदारसंघ महिलेसाठी राखीव झाल्यामुळे प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांच्या नावाची चर्चा आहे.
बाज (ता. जत) गटातील आकाराम मासाळ २००७ मध्ये निवडून आले होते. त्यांना समाजकल्याण विभागाच्या सभापती पदाची संधी मिळाली होती. यांचाही मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांना निवडणुकीपासून दूर राहावे लागले होते. यावर्षी पुन्हा हा मतदारसंघ खुला झाल्यामुळे ते निवडणूक मैदानात उतरले आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादीकडून होते. यावेळी ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.
शिवाजी डोंगरे सलग दहा वर्षे माधवनगर (ता. मिरज) जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करीत आहेत. यावेळी त्यांचा मतदारसंघ महिलांसाठी खुला झाल्यामुळे, त्यांच्या पत्नी येथून निवडणूक लढविणार आहेत, तर कवलापूर खुल्या गटातून डोंगरे स्वत: निवडणुकीच्या मैदानात आहेत. पूर्वी ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक मैदानात होते. यावेळी भाजपकडून उतरणार आहेत. (प्रतिनिधी)
पुन्हा जिल्हा परिषदेत :
येण्याची शक्यता...
अभिजित पाटील (चिकुर्डे, ता. वाळवा), सत्यजित देशमुख (कोकरूड, ता. शिराळा), जितेंद्र पाटील (बोरगाव, ता. वाळवा), प्रा. डॉ. सुषमा नायकवडी (वाळवा), अॅड्. चन्नाप्पा होर्तीकर (उमदी, ता. जत), छायाताई पाटील (कामेरी, ता. वाळवा), सुनील पाटील (विसापूर, ता. तासगाव), दादासाहेब सूर्यवंशी (अंकलखोप, ता. पलूस), संग्राम पाटील (भिलवडी, ता. पलूस), अॅड्. बाबासाहेब मुळीक (नागेवाडी, ता. खानापूर), शिवाजी डोंगरे (कवलापूर, ता. मिरज), कांचन पाटील (भोसे, ता. मिरज), मालन मोहिते (देवराष्ट्रे, ता. कडेगाव), आकाराम मासाळ (बाज, ता. जत), बसवराज बिराजदार (जाडरबोबलाद, ता. जत)