जुन्या फायरमन भरतीत कारभाऱ्यांनी मारला डल्ला
By admin | Published: December 28, 2015 12:03 AM2015-12-28T00:03:01+5:302015-12-28T00:27:57+5:30
तासगाव नगरपालिका : चार जागांची भरती; लाखोंचा सौदा झाल्याची शहरात चर्चा
दत्ता पाटील- तासगाव वर्षभरापूर्वी तासगाव पालिकेत दोन टप्प्यात फायरमनच्या चार जागांची भरती झाली होती. त्यावेळी स्थायी समितीत काँग्रेससह आबा गट आणि काका गटाच्या नगरसेवकांचा समावेश होता. या समितीतील काही कारभाऱ्यांनी भरतीसाठी सौदा करुन लाखोंचा डल्ला मारला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ‘लोकमत’ने रविवारी प्रसिध्द केलेल्या बातमीनंतर पालिकेतील जुने कारनामेही चव्हाट्यावर आले आहेत.
तासगाव नगरपालिकेमार्फत डिसेंबर २०१४ मध्ये फायरमनच्या दोन जागांची भरती झाली होती. त्यानंतर नगरविकास खात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी पुन्हा दोन जागांची भरती झाली होती. या भरती प्रक्रियेत दोन्ही टप्प्यात काँग्रेसचे नगराध्यक्ष, तर आबा गटाचे उपनगराध्यक्ष होते. तसेच स्थायी समितीच्या सभापती बदलामुळे दोन्ही टप्प्यातील भरतीत काही सदस्यांत फेरबदल झाले होते. मात्र आता ही भरती प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
काँग्रेस, आबा गट आणि काका गटाचे कारभारी स्थायी समितीवर असतानादेखील यातील काही कारभाऱ्यांनी फायरमन भरती प्रक्रियेत सेटिंग केले असल्याची चर्चा आहे. चारपैकी तीन जागांसाठी ४ लाख ७५ हजारांपासून ते ७ लाखांपर्यंत दर ठरला असल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला असून, राजकीय वर्तुळात त्याची उघडपणे चर्चा होताना दिसून येत आहे.
या भरती प्रक्रियेत समितीबाहेरील काही नगरसेवकांनाही सहभागी करुन घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. अशा नगरसेवकांची ४६ हजार रुपयांची बोळवण करुन, दोन-तीन बड्या कारभाऱ्यांनी लाखोंच्या घरात डल्ला मारला असल्याची चर्चा होत आहे.
चौकशी होणार का?
संभाव्य फायरमन भरतीत दोन नगरसेवकांनी आर्थिक तडजोडी केल्याच्या चर्चेची बातमी रविवारी ‘लोकमत’मधून प्रसिध्द करण्यात आली. या बातमीनंतर पालिकेतील अंतर्गत भानगडी चव्हाट्यावर आल्या. काही नगरसेवकांनी खासगीत त्याची कबुलीही दिली. आता जुन्या भरती प्रक्रियेतही आर्थिक तडजोडी झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यावेळी सर्वच गट-तट सत्तेत सहभागी होते. आता भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे जुन्या भरती प्रक्रियेची चौकशी सत्ताधाऱ्यांकडून होणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
पाणी योजनेच्या कामातही डल्ला?
शहरातील नागरिकांसाठी लाभदायी ठरणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील पाणी योजनेचे काम सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांतून सातत्याने चर्चा होत आहे. या योजनेचा लांडघोल येथे जॅकवेल आहे. या ठिकाणी बसविण्यात आलेले पंप निकृष्ट दर्जाचे असून पाईपही गंजक्या असल्याच्या तक्रारी होत्या. याबाबतदेखील वर्षभरापूर्वी प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला होता. नेमका त्याचाच गैरफायदा घेत, त्यावेळच्या संबंधित अधिकारी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारावर दबाव टाकून लाखोंच्या घरात डल्ला मारला असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
भरती झालेल्या चार फायरमनपैकी एका फायरमनची आर्थिक कुवत नसल्यामुळे काही नगरसेवकांनी स्वत:चे वजन वापरून विनामोबदला त्याला भरती करुन घेतले. मात्र पालिकेतील काही कारभाऱ्यांनी भरतीनंतरही संबंधित फायरमनवर पैशासाठी दबाव टाकला होता. मात्र त्यानंतरही तडजोड झाली नाही. त्यामुळे संबंधित फायरमनला त्याचे मुख्य काम सोडून टँकरवर झाडांना पाणी घालण्याचे काम सोपविण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
वशिल्याच्या भरतीने नागरिकांच्या जिवाशी खेळ...
फायरमनच्या चारपैकी तीन जागांसाठी काही कारभाऱ्यांनी सेटलमेंट केली. बडी रक्कम मिळविण्यासाठी मर्जीतील उमेदवारांची निवड केली. मात्र या भरतीतील दोन फायरमनना अग्निशमनचे कामच समाधानकारकरित्या येत नसल्याचे चित्र आहे. या भरती प्रक्रियेनंतर काही महिन्यातच शहरातील एका शीतगृहाला भीषण आग लागली होती. त्यावेळी या वशिल्याच्या फायरमन कामगारांचा कारभार नगरसेवकांच्यादेखील नजरेला आला. काम चांगले नसल्यामुळे त्यावेळी एका नगरसेवकाने फायरमनच्या श्रीमुखातदेखील लगावले होते.