धामणीत दरोडा टाकून वृद्धेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:56+5:302021-07-23T04:17:56+5:30
फोटो : २२०७२०१२१ : तासगाव ०१ : तासगाव तालुक्यातील धामणी येथे गुरुवारी रात्री याच बंगल्यावर धाडसी दरोडा पडला. तासगाव ...
फोटो : २२०७२०१२१ : तासगाव ०१ : तासगाव तालुक्यातील धामणी येथे गुरुवारी रात्री याच बंगल्यावर धाडसी दरोडा पडला.
तासगाव : तालुक्यातील धामणी येथे गुरुवारी रात्री धाडसी दरोडा पडला. दरोडेखोरांनी बंगला फोडून शालूबाई पांडुरंग पाटील (वय ८०) या वृद्धेचा खून करून तिच्या अंगावरील तीन लाखांचे सोन्याचे दागिने लांबविले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत शालूबाईंचा मुलगा सुभाष पांडुरंग पाटील यांनी सांगितले की, ते पत्नी, मुलांसह धामणी येथे राहतात. त्यांना रमेश पाटील व शहाजी पाटील असे दोन भाऊ आहेत. ते गलाई व्यावसायिक असून, ते तामिळनाडू राज्यात आहेत. दोघा भावांचा बंगला स्वतंत्र असून, बंगल्यात आई एकटीच राहत होती.
बुधवारी ते पत्नीसह शेतात गेले होते. यावेळी शालूबाईंचा भाचा महेश कुलकर्णी याने त्यांना गावातील घरी नेले होते. दिवसभर त्या त्याच्याच घरी होत्या. सायंकाळी पाच वाजता त्याने शालूबाईंना घरी आणून सोडले व निघून गेला. यावेळी त्या सुभाष यांच्या घरी चहा पिऊन बंगल्यावर गेल्या.
गुरुवारी सकाळी आठ वाजता भावाच्या बंगल्यातील गाडी आणण्यासाठी सुभाष गेले होते. यावेळी घराच्या कुंपणाच्या प्रवेशद्वारास आतून कुलूप घातले होते. यावेळी सुभाष व मुलगा तेजस यांनी शालूबाईंना हाका मारल्या. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. घराचा पहिल्या मजल्यावरील दरवाजा तुटलेला दिसला. तेजस याने पहिल्या मजल्यावर जात तेथून खालच्या मजल्यावर येऊन आतील कडी काढली.
शालूबाई बेडरूममध्ये मृतावस्थेत दिसल्या. त्यांचे तोंड व गळा कापडाने बांधले होते. गळा आणि तोंड दाबून त्यांचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. त्यांच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या, दोन सोनसाखळ्या, चार अंगठ्या, मोहनमाळ, कर्णफुले असे तीन लाखांचे सोन्याचे दागिने गायब होते. खोलीतील कपाट फोडून साहित्य विस्कटलेले होते.
ही बातमी समजताच घरच्यांनी एकच हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या. या घटनेने तालुका हादरला असून, पोलीस तपास करत आहेत.
चौकट
खिडकीवरून पहिल्या मजल्यावर प्रवेश
चोरटे बंगल्याच्या पश्चिम बाजूकडील लोखंडी खिडकीवरून पहिल्या मजल्यावर गेले. तेथील दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून त्यांनी आत प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.