कुची-शिरढोण मार्गावर अपघातात वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:27 AM2021-05-12T04:27:06+5:302021-05-12T04:27:06+5:30
घाटनांद्रे : मिरज- पंढरपूर राष्ट्रीय मार्गावर कुची- शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) दरम्यान दुचाकीची टँकरला धडक बसून वृद्ध जागीच ठार झाला. ...
घाटनांद्रे : मिरज- पंढरपूर राष्ट्रीय मार्गावर कुची- शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) दरम्यान दुचाकीची टँकरला धडक बसून वृद्ध जागीच ठार झाला. रामचंद्र निवृत्ती जाधव (वय ६०, रा. कुची), असे मृताचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास घडली. घटनेची कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद आहे.
कुची येथील जाधवमळा परिसरातील रामचंद्र जाधव हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच-१० डीएफ-३३४६) बोरगाव (ता. कवठे महांकाळ) येथे पाहुण्यांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. तेथून ते परत येत होते. यावेळी मिरज- पंढरपूर राष्ट्रीय मार्गावर रस्त्याकडेला पाण्याचा टँकर (क्र. एमपी-०४ एचई-१८१२) उभा होता. या टँकरला दिशादर्शक लाइट लावले नव्हते. यातच अंधार असल्याने जाधव यांना टँकर दिसला नसावा. यामुळे त्यांच्या दुचाकीची पाठीमागून टँकरला धडक बसली. डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेबाबत दीपक ज्ञानदेव जाधव यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत वर्दी दिली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपाली गायकवाड करीत आहेत.
चाैकट
खबरदारी गरजेची
सध्या मिरज- पंढरपूर मार्गाचे काम सुुरू आहे. सोमवारी झालेल्या अपघातातील टँकर रस्ते कामासाठी पाणीपुरवठा करत होता. या कामाच्या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे; अन्यथा असे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.