एटीएम कार्ड हातचलाखीने चोरून वृद्धाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:26 AM2021-02-13T04:26:24+5:302021-02-13T04:26:24+5:30
सांगली : शहरातील गणपती मंदिराजवळ असलेल्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने अज्ञाताने वृद्धास ४० हजाराला गंडा घातला. याप्रकरणी ...
सांगली : शहरातील गणपती मंदिराजवळ असलेल्या एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने अज्ञाताने वृद्धास ४० हजाराला गंडा घातला. याप्रकरणी बालेचंद गुलाबहुसेन सय्यद (वय ६९, रा. गोंधळे प्लॉट, नुराणी मस्जिदजवळ, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास सय्यद पैसे काढण्यासाठी गणपती मंदिराजवळ असलेल्या एसबीआयच्या एटीएममध्ये आले होते. याचवेळी आतमध्ये असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने हातचालाखी करत सय्यद यांचे एटीएम कार्ड बदलले. हा प्रकारही त्यांच्या लक्षात आला नाही. त्यानंतर चोरट्याने त्या एटीएमद्वारे परस्पर ४० हजार रुपये काढून घेतले. काही वेळानंतर एटीएममधील चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलिसांशी संपर्क साधत फसवणुकीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत तपास सुरू केला आहे.