जुनी पेन्शन योजना: संपात सहभागी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही, अन्..; सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
By संतोष भिसे | Published: March 20, 2023 05:02 PM2023-03-20T17:02:14+5:302023-03-20T17:02:55+5:30
संप कालावधीत अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा व नैसर्गिक आपत्तीमधील कोणतीही कामे थांबू नयेत यासाठी नियोजनाचे आदेश प्रशासनाला दिले
सांगली : संपात सहभागी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही. कामावर येणाऱ्यांना अडवल्यास कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला. संप कालावधीत अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा व नैसर्गिक आपत्तीमधील कोणतीही कामे थांबू नयेत यासाठी नियोजनाचे आदेश प्रशासनाला दिले.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाभरातील शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, आरोग्य विभागाने प्रसूती, लसीकरण अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याची खबरदारी घ्यावी. ग्रामीण भागात पाणीपुरवठा व अत्यावश्यक सेवांसाठी संबंधितांनी दक्ष रहावे. संपात सहभागी कर्मचाऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार नोटीस बजावण्यात यावी. काम नाही वेतन नाही ही बाब संपात सहभागी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणावी. संपात सहभागी होणे हे गैरवर्तन असून कामावर रुजू होण्यासाठी आवाहन करावे.
... तर शिस्तभंगाची कारवाई
संपात सहभागी न होणाऱ्या कर्मचाऱ्यावर संपकरी कर्मचाऱ्यांनी कोणताही दबाव आणू नये. अशा घटना घडल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.