जुनी पेन्शन योजना: सांगलीत सरकारी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By संतोष भिसे | Published: March 16, 2023 04:47 PM2023-03-16T16:47:54+5:302023-03-16T16:48:21+5:30
संपाच्या तिसऱ्या दिवशीही एकजूट कायम राखत जुन्या पेन्शनच्या मागणीवर ठाम
सांगली : सरकारी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संपाच्या तिसऱ्या दिवशी सांगलीत मोर्चा काढला. हजारोंच्या संख्येने आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. शासकीय धोरणांविरोधात घोषणाबाजी करत जुन्या पेन्शनसाठी आवाज बुलंद केला.
हम होंगे कामयाब असा नारा देत आदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. तत्पूर्वी सकाळी विश्रामबागमध्ये क्रांतिंसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. ढोलताशांच्या निनादात कर्मचाऱ्यांनी ठेक्यावर घोषणा देत शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. संपाच्या तिसऱ्या दिवशीही एकजूट कायम राखत जुन्या पेन्शनच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. सांगली व मिरज शासकीय रुग्णालय, कृषी विभाग, महसूल, शिक्षण आदी विभागांचे कर्मचारी मोर्चात सामील झाले. शासकीय रुग्णालयाच्या पारिचारिकांनी अखंड घोषणाबाजी करत मोर्चामध्ये चैतन्य कायम राखले.
मोर्चाचे रुपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेट मिटींगमध्ये झाले. आंदोलकांचे नेते डी. जी. मुलाणी, प्रकाश काळे, संजय व्हनमाने, प्रतिभा हेटकाळे आदींनी भूमिका मांडल्या. जुनी पेन्शन घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. व्हनमाने म्हणाले, आमदार-खासदारांना गलेलठ्ठ पेन्शन देणाऱ्या सरकारने आयुष्यभर सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय करणे सहन केले जाणार नाही. प्रतिभा हेटकाळे म्हणाल्या, आम्ही आमच्या हक्काची पेन्शन मागत आहोत. हा लढा आमचा स्वत:चा तर आहेच, शिवाय भविष्यात नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही आहे.
महिला आक्रमक
मोर्चामध्ये महिला कर्मचारी अग्रभागी होत्या. शेवटपर्यंत आक्रमक राहून त्यांनी मोर्चाचे नेतृत्व सांभाळले. अखंड घोषणाबाजीने आंदोलनस्थळी वातावरण निर्मिती केली.
हम होंगे कामयाब...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी `हम होंगे कामयाब एक दिन, जुनी पेन्शन लेके रहेंगे एक दिन` या गाण्यावर ताल धरत आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कर्मचारी मोर्चासाठी आले होते.
जिल्हा परिषदेत ठिय्या
जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच ठिय्या मारला होता. महिला व पुरुष कर्मचारी जुनी पेन्शन मागणीच्या टोप्या घालून प्रवेशदारात बसले होते. कर्मचारी नसल्याने कामकाजावर परिणाम झाला.