जुने सांगली जिल्हाधिकारी कार्यालय प्रथमच शांत शांत...इमारत अनेक वर्षांची साक्षीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 11:37 PM2019-04-02T23:37:47+5:302019-04-02T23:38:45+5:30
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग असली तरी, जिल्ह्याचा १०८ वर्षे कारभार पाहिलेले जुने जिल्हाधिकारी कार्यालय यंदा प्रथमच या
सांगली : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग असली तरी, जिल्ह्याचा १०८ वर्षे कारभार पाहिलेले जुने जिल्हाधिकारी कार्यालय यंदा प्रथमच या घाईगडबडीपासून दूर राहणार आहे. नेतेमंडळी, कार्यकर्त्यांच्या गर्दीने फु लून जाणाऱ्या या कार्यालयासमोरील मैदान आता ओस पडले आहे.
मिरज रस्त्यावर सांगली शहराच्या वैभवात भर घालणारी भव्य व देखणी इमारत म्हणून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीकडे पाहिले जाते. सध्या याच इमारतीमधून लोकसभा निवडणुकीचे कामकाज चालत आहे. ही इमारत नवीन व आकर्षक असली तरी, आजवरच्या अनेक निवडणुकांची खरी साक्षीदार जुनी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आहे.
जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत म्हणजे अनेक घटनांची साक्षीदार असलेली वास्तू. जिल्ह्यातील अनेक लक्षवेधी आंदोलने, मोर्चे, उपोषणे या इमारतीने अनुभवली आहेत. शहरातील राजवाडा चौकापासून जवळच ही जुनी जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आहे. आजही या इमारतीवर त्याच्या स्थापनेचा म्हणजेच १९०९ चा उल्लेख असून, त्यावर ‘रेव्हेन्यू आॅफिसेस’ असे लिहिलेले आहे. पण आता या इमारतीमध्ये केवळ आठवणीच शिल्लक आहेत. ही इमारत कित्येक वर्षांच्या आठवणींची साक्षीदार आहे.
ब्रिटिशांच्या राजवटीपासून महसुली कारभार या इमारतीत चालत असे. स्वातंत्र्यानंतरही हीच इमारत जिल्ह्याच्या प्रशासनाची मुख्य महसुली इमारत बनली. सुरुवातीला दक्षिण सातारा व त्यानंतर जिल्ह्याच्या स्थापनेपासून या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालय होते. शहरातील भुईकोट किल्ल्याचा भाग असणारी ही दगडी इमारत आजही सुस्थितीत आहे.
सध्या या इमारतीमध्ये सेतू कार्यालयासह इतर काही विभागांची कार्यालये सुरू असली तरी, इमारतीची रया गेली आहे. या पार्श्वभूमीवर प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने यावेळी जुने जिल्हाधिकारी कार्यालय सुने पडणार आहे.
सर्व लोकसभा निवडणुकांच्या कामकाजाची नोंद
आजवर झालेल्या सर्व लोकसभा निवडणुकांचे कामकाज याच इमारतीतून झाले आहे. केवळ लोकसभाच नव्हे, तर सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रियाही याच इमारतीतून झाली आहे. जुन्या ठिकाणी असलेले अल्पबचत सभागृह तर अनेक जुन्या आठवणींचे साक्षीदार आहे. अनेक नेतेमंडळींची भाषणे, जिल्ह्याच्या समस्यांवरील तोडगा येथूनच होत असे. इतकेच नव्हे, तर राज्याच्या प्रशासनात आपल्या कामाचा ठसा उमटविलेल्या अनेक अधिकाऱ्यांनीही याच इमारतीतून जिल्हाधिकारी म्हणून कारभार पाहिला होता.
सांगलीच्या राजवाड्यातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही असे ओस पडले आहे.