सांगली शहरात पुराने टाकला दम; टिळक चौक, कोल्हापूर रोड खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 07:21 PM2019-08-13T19:21:46+5:302019-08-13T19:24:13+5:30
शहरातील पुराने दम टाकला आहे. टिळक चौक, कोल्हापूर रोड या दोन्ही रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. बायपास रस्त्यावर मात्र अद्याप पाणी आहे.
सांगली : शहरातील महापूर ओसरण्यास सुरूवात झाली असून, टिळक चौक, कोल्हापूर रोड वाहतुकीसाठी खुला झाला आहे. कृष्णा नदीकाठावरील जामवाडी, मगरमच्छ कॉलनी, शिवशंभो चौकासह, स्टेशन रोड, मारुती चौक, रामनगर, भारतनगर या परिसरात अद्यापही पुराचे पाणी आहे. शामरावनगरमधील काही भागात पाणी साचून आहे.
शहरातील पुराने दम टाकला आहे. टिळक चौक, कोल्हापूर रोड या दोन्ही रस्त्यांवरील पाणी कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे. बायपास रस्त्यावर मात्र अद्याप पाणी आहे. त्यामुळे इस्लामपूरकडे जाणारी अवजड वाहतूक बंद आहे. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, ईदगाह मैदान, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी परिसरात अद्यापही पुराचे पाणी आहे. मारुती चौकातही चार ते पाच फूट पाणी आहे. टिळक चौकातील जनावरांच्या बाजारातील पाणी कमी झाल्याशिवाय मारुती चौक खुला होणार नाही.
स्टेशन चौकातही दोन ते तीन फूट पाणी आहे. ट्रक पार्किंगमध्ये पाणी असल्याने तेथील पाणी जाण्यास वेळ लागणार आहे. इतर भागातील पाणी बऱ्यापैकी ओसरले आहे. कोल्हापूर रोडवरील पाणी कमी झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. पण शामरावनगरच्या अनेक भागात अद्यापही पाणी आहे. तेथील रस्त्यावरून पाणी वाहत आहे. शामरावनगरच्या पूर्वेकडील पूर ओसरला आहे, पण पश्चिम भागात मात्र पाणी साचून आहे. हे पाणी बाहेर काढण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
महापालिकेची कागदपत्रे भिजली
महापालिकेच्या मुख्यालयातही पाच ते सहा फूट शिरले होते. त्यात लेखा विभाग खालच्या मजल्यावर असल्याने तेथील कागदपत्रे मोठ्या प्रमाणात भिजली आहेत. स्थायी समिती सभागृहातील फर्निचरचे नुकसान झाले आहे. तळमजल्यावर पंतप्रधान आवास योजना कक्ष, समाजकल्याण कक्ष, प्रशासकीय कार्यालय आहे. या कार्यालयातूनही पाणी शिरले होते.