मणदूरमध्ये जुन्या बाधितांना कोरोनाचा स्पर्शही नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:45+5:302021-05-27T04:27:45+5:30
शिराळा : गतवर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मणदूर (ता. शिराळा) गावात यंदाही दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र जुन्या बाधितांना ...
शिराळा : गतवर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मणदूर (ता. शिराळा) गावात यंदाही दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र जुन्या बाधितांना कोरोनाचा स्पर्श नाही. दुसऱ्या लाटेतील रुग्णही सकारात्मक विचारसरणी, कष्टाळू वृत्ती, लसीकरण आणि धाडसी बाणा यामुळेच ठणठणीत बरे झाले आहेत.
मणदूरला गतवर्षी ९३ वर्षीय वृद्ध व्यक्तीपासून सहा महिन्याच्या दोन बालकांनीही कोरोनावर मात केली होती. जेमतेम तीन हजार लोकवस्तीचे हे गाव. वारणेच्या काठावर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या गावात रुग्णांची संख्या अधिक असली, तरी दगावणाऱ्यांची संख्या मात्र हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल ६३ रुग्ण गावात सापडले. तालुक्यातच नव्हे, तर जिल्ह्यात मणदूर हॉटस्पॉट ठरले. त्यामुळे गावासह जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दीड महिने संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आले. आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न, प्रशासनाची मदत, ग्रामपंचायतीचे कौतुकास्पद कार्य यामुळे दोन महिन्यानंतर येथील कोरोना आटोक्यात आला. ६३ बाधित रुग्णांपैकी दोन रुग्ण दगावले. पुढे संपूर्ण गाव कोरोनामुक्त झाले.
दुसऱ्या लाटेत महिनाभर गावात एकही रुग्ण नव्हता. त्यानंतर मात्र येथील संख्या पुन्हा वाढू लागली. आजअखेर १३० जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी केवळ एक महिला दगावली. उर्वरित सर्व रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. पहिल्या लाटेत बाधित झालेल्या ६३ रुग्णांपैकी एकही रुग्ण पुन्हा दुसऱ्या लाटेत बाधित झालेला नाही. किरकोळ लक्षणे दिसली, तरी ग्रामस्थ स्वतःहून आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेत आहेत. नियमांचे पालनही स्वतःहून करत आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. आर. परब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका ग्रामस्थांची काळजी घेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत आजअखेर साडेतीन हजारजणांचे लसीकरण झाले आहे.
आरोग्य केंद्रात सध्या चार ऑक्सिजन बेड, नऊ सिलिंडर
उपलब्ध आहेत. बाधित रुग्णांवर येथेच उपचार केले जात आहेत. गंभीर रुग्ण असेल, तर कोकरूड किंवा शिराळा येथे हलवले जात आहे.
चौकट-
मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १३० रुग्ण मणदूर आणि मिरूखेवाडी येथील आहेत. यापैकी एक दगावला असून, उर्वरित बरे झाले आहेत. पहिल्या लाटेत बाधित झालेल्यात अँटिबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा स्पर्श त्यांना झालेला नाही.
- डॉ. एम. आर. परब,
वैद्यकीय अधिकारी, मणदूर