Sangli: गोवा विधानसभेच्या अध्यक्षांमुळे आरग येथील ओम, शिवाच्या डोक्यावर छत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 12:11 PM2024-06-11T12:11:28+5:302024-06-11T12:11:28+5:30
शिवा विष्णू पवार आणि त्याचा भाऊ ओम यांच्या आई-वडिलांचा कोरोना साथीमध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून दोघेच छोट्याशा खोलीत राहतात.
सांगली : आरग (ता. मिरज) येथील ओम आणि शिवा या निराधार तरुण भावंडांच्या डोक्यावर हक्काचे छत नाही. ही बातमी गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. रमेश तवडकर यांच्यापर्यंत पोहोचली. रविवारी (दि.९) ते तडक आरगमध्ये आले. दोघा भावंडांची भेट घेतली. त्यांना हक्काचे घर बांधून देण्याची ग्वाही दिली. तवडकर यांच्या या अनोख्या भेटीने या भावंडांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
शिवा विष्णू पवार आणि त्याचा भाऊ ओम यांच्या आई-वडिलांचा कोरोना साथीमध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून दोघेच छोट्याशा खोलीत राहतात. मोलमजुरी करून कमावतात आणि स्वत:च स्वयंपाक करून उदरनिर्वाह करतात. त्यांना हक्काचे घर नसल्याची माहिती डॉ. तवडकर यांना त्यांचे मित्र भाजप नेते मोहन वनखंडे यांनी दिली होती. त्यानुसार रविवारी दुपारी डॉ. तवडकर यांच्या वाहनांचा ताफा आरगमध्ये आला. गणपती मंदिराजवळ इंदिरानगरमध्ये वनखंडे, सरपंच सुरेखा नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. वनखंडे यांनी तवडकर यांच्या भेटीची पार्श्वभूमी सांगितली. तवडकर यांनी या भावंडांना श्रमधाम ट्रस्टमार्फत घर बांधून देण्याची ग्वाही दिली.
पवार भावंडांनी शासकीय योजनेतून घरासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज केला होता, पण यावर्षीच्या यादीत त्यांचे नाव येऊ शकले नाही. पण, आता श्रमधाममुळे त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. डॉ. तवडकर यांची श्रमधाम संस्था गोव्यात बेघरांना घरे बांधून देण्याचे काम करते. गतवर्षी त्यांनी २० घरे बांधून दिली. यावर्षी १०० घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. लाभार्थ्याला पैसे देण्याऐवजी थेट घरे बांधून देते. आरगमध्ये पवार भावंडांच्या भेटीवेळी त्यांच्या श्रमधाम संस्थेचे स्वयंसेवकही सोबत आले होते.
गोव्याबाहेर पहिलेच घर
डॉ. तवडकर म्हणाले, शिक्षणासाठी मी मिरजेत बरीच वर्षे राहण्यास होतो. विद्यार्थिदशेत माझीही आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे मला गोरगरिबांच्या परिस्थितीची चांगली जाणीव आहे. याच पार्श्वभूमीवर घरबांधणीचा उपक्रम श्रमधामच्या माध्यमातून राबविला जातो. या कामासाठी लोकांनीही आर्थिक मदत करावी. ज्यांना शक्य नसेल, त्यांनी श्रमदान करावे. या पावसाळ्यानंतर पवार भावंडांना स्वत:चे घर मिळेल. आरग येथील घरकुल गोव्याबाहेरील पहिलेच आहे.