मैत्रीच्या बहाण्याने घरात शिरुन साडेचार लाखांच्या दागिन्यावर डल्ला, महिला जेरबंद; सांगलीतील घटना
By शरद जाधव | Published: March 2, 2023 05:58 PM2023-03-02T17:58:05+5:302023-03-02T17:58:36+5:30
मैत्री करुन घरात येणे जाणे वाढवायची. काही काळानंतर घरातील सदस्यांची नजर चुकवून दागिन्यांवर व अन्य ऐवजावर डल्ला मारायची.
सांगली : मैत्री करुन घरात शिरलेल्या महिलेने साडेचार लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. पोलिसांनी तिला शिताफीने जेरबंद केले. मीना शितल भट्टड (वय ४२, रा. मध्यवर्ती बँकेजवळ, गावभाग, सांगली) असे तिचे नाव आहे.
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिस पथक गस्तीवर होते. यादरम्यान, संशयित म्हणून भट्टड हिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी सुरु करताच दोन्ही चोऱ्यांची कबुली दिली. सचिन संकपाळ यांच्या घरातून तिने दागिने लंपास केले होते. सुनिता जयवंत कुलकर्णी यांच्याही घरातून सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले. दोन्ही गुन्ह्यांतील साडेआठ तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले. तिच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, रुपाली गायकवाड, विनायक शिंदे, सचिन शिंदे, झाकीरहुसेन काझी, अभिजित माळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आधी मैत्री, मग धोका
संशयित मीना भट्टड हिचा मैत्रीतून चोरीचा फंडा आहे. गोड बोलून ओळख वाढवते, विश्वास संपादन करते. त्यातून मैत्री करुन घरात येणे जाणे वाढवायची. काही काळानंतर घरातील सदस्यांची नजर चुकवून दागिन्यांवर व अन्य ऐवजावर डल्ला मारायची. याच प्रकारे तिने आणखी काहीजणांच्या घरात चोरी केली आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत.