सावधान! सांगली कारागृहाच्या तटबंदीवरील तारांमध्ये विजेचा प्रवाह, स्पर्श करताच वाजणार ‘अलार्म’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 12:02 PM2023-12-14T12:02:19+5:302023-12-14T12:29:22+5:30
कैद्याने पलायनाचा प्रयत्न केल्यास ‘करंट’ लागू शकतो
घनशाम नवाथे
सांगली : ब्रिटिशकालीन जिल्हा कारागृहाच्या तटबंदीवरून गतवर्षी आणि नुकतेच कैदी पळाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली. आता शेवटचा उपाय म्हणून तटबंदीवर उभारलेल्या सहा फुटांच्या तारेच्या ‘वाय’ आकारातील कम्पाउंडच्या तारांमधून विजेचा प्रवाह खेळता ठेवला आहे. त्यामुळे कैद्याने पलायनाचा प्रयत्न केल्यास ‘करंट’ लागू शकतो. तसेच तत्काळ ‘अलार्म सिस्टीम’मधून भोंगाही वाजू लागेल.
गतवर्षी जुलै २०२२ मध्ये तासगावच्या खुनातील संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड (रा. यळगूड, ता. सिंदगी) हा तटबंदीवरून उडी मारून पळाला, तर गत महिन्यात ‘पोक्सो’च्या गुन्ह्यातील सदाशिव अशोक सनदे (२५, मिसाळवाडी, आष्टा) हा पटवर्धन हायस्कूलच्या बाजूने पळाला. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात असल्याचा इशारा मिळाला. या घटनेपूर्वी गांजा, दारू, मोबाइल तटबंदीवरून आतमध्ये टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
कारागृहाभोवती गेल्या काही वर्षात शाळा, अपार्टमेंट व नागरी वस्ती झाली आहे. नागरिकांच्या घरावर चढून आतमध्ये मटणाची पाकिटे टाकल्याचा प्रकारही पूर्वी घडला होता. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तटबंदीवर जवळपास सहा फुटांचे तारेचे कम्पाउंड असून, त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला आहे तसेच आतमध्ये धोक्याच्या ठिकाणी पत्रे मारले आहेत.
कैदी क्षमता २३५ सध्या ४००
सांगलीच्या कारागृहात पुरुष कैद्यांची क्षमता २०५, तर स्त्रियांची क्षमता ३० इतकी आहे. २३५ क्षमतेच्या कारागृहात सद्य:स्थितीत ४०० कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनावर ताण येतो. जिल्ह्यातील इतर १०० हून अधिक कैदी कळंबा कारागृहात आहेत.
खुनातील १९६ संशयित
जिल्हा कारागृहात एक वर्षाच्या आतील शिक्षा लागलेल्या कैद्यांना ठेवले जाते, तसेच गंभीर गुन्ह्यात जामीन न झालेले कच्चे कैदीही येथे ठेवले जातात. खुनाचा आरोप असलेले १९६ संशयित सध्या कारागृहात आहेत. त्यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.
कारागृहातील बंदींची संख्या पाहता मनुष्यबळ अपुरे पडते. कैदी पलायनाचे तसेच इतर गैरप्रकार घडू नयेत म्हणून तटबंदीच्या वरती उभारलेल्या तारेच्या कम्पाउंडमधून विजेचा प्रवाह खेळता ठेवला आहे. -विवेक झेंडे, कारागृह अधीक्षक, सांगली