Sangli: थरारक शर्यतीत विट्याच्या पालखीने मारली बाजी; दोन्ही गटात जोरदार रेटारेटी, मारझोड
By हणमंत पाटील | Published: October 25, 2023 05:56 PM2023-10-25T17:56:26+5:302023-10-25T18:00:21+5:30
सुमारे दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा
दिलीप मोहिते
विटा : सुमारे दीडशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या विटा (जि. सांगली) येथे विजयादशमी दिवशी श्री रेवणसिद्ध देवाच्या दोन पालख्यांची थरारक शर्यत झाली. त्यामध्ये तब्बल पाच वर्षांनी विट्याच्या श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने बाजी मारली. पालखी सोहळ्याला उपस्थित लाखो भाविक यांनी दोन्ही गटात शर्यतीवेळी झालेली रेटारेटी, तुडवातुडवी, मारामारी पहिली. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
विजयादशमीला विटा आणि सुळेवाडी येथील देवांच्या पालखी शर्यती पार पडल्या. मंगळवारी दुपारी सुळेवाडी व विटा येथील श्री रेवणसिद्ध या एकाच देवाच्या दोन पालख्या सायंकाळी पाच वाजता श्री काळेश्वर मंदिरासमोर शर्यतीसाठी आल्या. सुळेवाडीच्या पालखीला पाच पाऊल पुढे थांबण्याचा परंपरेनुसार मान दिला. सव्वा पाच वाजता पालख्यांची शर्यती सुरू झाली.
सुरुवातीला दोन्ही पालख्या एकमेकांना खेटून होत्या. पालख्यांचे समर्थक खांदेकरी पालखी पुढे नेण्यासाठी धडपडत होते. त्याचवेळी विटा बॅँकेसमोर सुळेवाडीच्या मूळ स्थानाची पालखी उजव्या बाजूला ढकलली गेली. विट्याच्या समर्थकांनी पालखी रोखल्याने सुटका करून घेण्यासाठी एकमेकांत हाणामारी झाली. त्यावेळी पोलिसांनीही पालखी रोखणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिला.
तोपर्यंत विट्यातील पालखी पुढे गेली. मूळ स्थान सुळेवाडीच्या पालखीने तितक्याच जोमाने आगेकूच केली. त्यावेळी विट्याच्या पालखीला मूळ स्थानच्या खांदेकरी समर्थकांनी अडवून धरल्याने मूळ स्थानची पालखी पुढे निघून गेली.
खानापूर नाक्यावर विट्यातील सुमारे शंभराहून अधिक कार्यकर्त्यांनी मूळ स्थानच्या पालखीला अडवून धरले. त्यावेळीही पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांचा मार खाऊनही विट्याच्या समर्थकांनी पालखी सोडली नाही. तोपर्यंत विट्याच्या पालखीने वेगात येऊन विजयाची पताका फडकविली. पाच वर्षांनंतर विट्याच्या श्री रेवणसिद्ध देवाच्या पालखीने यावर्षीची शर्यत जिंकली आणि विटेकरांनी एकच जल्लोष केला.
कडक पोलिस बंदोबस्त
पालखी शर्यतीसाठी उपअधीक्षक पद्मा कदम व पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त तैनात होता. या बंदोबस्ताचे चोख नियोजन करण्यात आले होते.
रेटारेटीच्या प्रकारात वाढ
अनेक वर्षांपासून पालखी शर्यती होतात. परंतु, प्रत्येक वर्षी पालख्या पाडणे, रेटारेटी करणे, पालख्या अडविणे अशा प्रकारांत वाढ होत आहे. यावर्षी या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे वर्षानुवर्षे परंपरा असलेल्या या शर्यती पोलिसांचा लाठीमार, खांदेकरी समर्थकांतील हाणामारी, पाडापाडीने वेगळ्या वळणावर पोहोचली असल्याचे दिसले.