दीड दिवसाच्या शाळेने अण्णा भाऊंना दिली आयुष्यभराची शिदोरी, वाटेगावातील शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाकडून कोटींचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 06:19 PM2023-07-18T18:19:17+5:302023-07-18T18:21:42+5:30
लौकिकार्थाने शिक्षण झाले नसले, तरी त्यांनी अनुभवाच्या शाळेत शेवटपर्यंत धडे गिरवले. साहित्याचे इमलेच्या इमले उभारले, पण त्यांचे वाटेगावातील घर मात्र चंद्रमौळीच राहिले.
सांगली : अवघ्या दीड दिवसाची शाळा शिकलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्याच्या वाटचालीत कडू-गोड अनुभवांची प्रचंड शिदोरी जमवली. सुख-दु:खाचे धडे गिरवत दुनियादारीची पीएच. डी. मिळवली. त्यांना ‘गमभन’ शिकवणारी वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्राथमिक शाळा आता करोडपती बनली आहे. या शाळेला शासनाने १ कोटी ३ हजार ६८० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून तिचा कायापालट केला जाणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापुरुषांशी संबंधित गावांतील शाळा विकसित करण्यासाठी शासनाने राज्यभरात निधी पुरविला आहे. १३ ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये वाटेगावमधील अण्णा भाऊंच्या शाळेचाही समावेश आहे. लौकिकार्थाने शिक्षण झाले नसले, तरी त्यांनी अनुभवाच्या शाळेत शेवटपर्यंत धडे गिरवले. साहित्याचे इमलेच्या इमले उभारले, पण त्यांचे वाटेगावातील घर मात्र चंद्रमौळीच राहिले. ते ज्या शाळेत गेले, ती शाळाही पडक्या भिंतींचीच राहिली.
कालांतराने पक्क्या बांधकामाची कौलारू इमारत उभी राहिली, पण अजूनही तिचे जुनाट स्वरूप कायम आहे. शंभर वर्षांहून अधिक जुनी इमारत गळत असल्याने तिच्यावर सिमेंटचे पत्रे घातले आहेत. आता सरकारी निधीतून अण्णा भाऊंची शाळा कात टाकेल. शाळेच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा निश्चित नसला, तरी ती त्यांचे आणखी एक स्मारक ठरणार आहे. गावात त्यांच्या घराशेजारी शासनाने यापूर्वीच स्मारक उभारले आहे. त्यामध्ये शिल्पसृष्टी आहे.
सरकारी पेन्शनवर सुनेचा उदरनिर्वाह
वाटेगावमध्ये अण्णांच्या स्मारकाशेजारीच त्यांची सून सावित्री राहते. युती शासनाने त्यांच्या नावाने ठेवलेल्या मुदतठेवीचे व्याज आणि निराधार योजनेतून मिळणारे निवृत्तीवेतन यातून त्यांचा चरितार्थ चालतो.