आष्ट्यात संसर्गजन्य रोगाने दीड हजार डुकरांचा मृत्यू, कुत्री पिसळण्याचा धोका; स्वच्छता मोहीमेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 04:26 PM2023-01-24T16:26:11+5:302023-01-24T16:26:36+5:30
परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य
आष्टा : आष्टा शहरात कोलाटी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर डुकरे पालनाचा व्यवसाय करण्यात येतो. मात्र, मागील काही दिवसांत संसर्गजन्य रोगामुळे सुमारे दीड हजार लहान-मोठी डुकरे दगावल्याने शहरात खळबळ माजली आहे. यात सुमारे ३५ ते ४० लाखांचे नुकसान झाले आहे.
आष्टा बसस्थानकाच्या समोरील बाजूला कोलाटी समाज वास्तव्यास आहे. या समाजातील नागरिकांकडून डुक्कर पालनाचा व्यवसाय वर्षानुवर्षे करण्यात येतो. शहरातील विविध गल्लीबोळात तसेच उपनगरात डुकरांचा वावर आहे. काही नागरिकांच्या तक्रारीमुळे पालिकेने त्यांना हा व्यवसाय बंद करण्याबाबत सूचनाही दिल्या होत्या. मात्र, हा व्यवसाय बंद झालेला नाही.
मागील काही दिवसांपूर्वी संकेश्वर परिसरातून नवीन डुकरे आणली होती. यानंतर डुकरे मृत होण्याची मालिका सुरू झाली. यामुळे संकेश्वरमधील डुकरांमुळेे हा संसर्ग झाला असावा, अशा अंदाज वर्तविला जात आहे. आष्ट्यासह इस्लामपूर, इचलकरंजी व कर्नाटकातील अनेक गावांत डुकरांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी सकाळी कोलाटी समाजाच्या वस्तीनजीकच गटारीमध्ये व परिसरात अनेक डुकरे मरून पडल्याने सर्वत्र दुर्गंधी निर्माण झाली. त्यानंतर बापूसाहेब शिंदे सेवाभावी संस्थेच्या वतीने पालिकेत याबाबत तक्रार केली
आष्टा शहरातील रमेश मोरे, विकी मोरे, विलास मोरे, विजय मोरे, रावसाहेब मोरे, प्रकाश मोरे, रामा मोरे, विनोद मोरे यांची डुकरे दगावली आहेत. त्यांनी याबाबत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. नगरसेवक विजय मोरे यांनी पालिकेला याबाबत माहिती दिली आहे.
आष्टा पालिकेच्या वतीने मृत्यू पावलेल्या डुकरांची पालिकेच्या घंटागाडी व ट्रॅक्टरमधून पालिकेच्या कचरा डेपोच्या जागेत व नागाव रस्त्याकडेच्या ओढ्यामध्ये विल्हेवाट लावली आहे.
दुर्गंधीचे साम्राज्य
आष्टा शहरातील स्वच्छता करण्याचे काम कोलाटी समाजातील स्त्री व पुरुष करीत आहेत. मात्र, ते वास्तव्य करीत असलेल्या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य आहे. गटारी कित्येक दिवसांपासून स्वच्छ केलेल्या नाहीत. पालिकेचे या परिसरात दुर्लक्ष आहे. त्यामुळे या परिसरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी होत आहे.
कुत्र्यांनाही धोका
शहरात आनंद कॉलनी, शिराळकर कॉलनी, चितारे कॉलनी, लगोड बंद, भाजी मंडई, नगरपालिका, गांधीनगर, दत्त वसाहत, थोटे गल्ली, जैन गल्ली परिसरात डुकरे दगावली आहेत. याचा संसर्ग होऊन कुत्री पिसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.